गुन्ह्यांच्या दोषसिद्धीत नागपूर ग्रा. पोलिस प्रथम
   दिनांक :26-Feb-2019
नागपूर,
भारतीय दंड विधानांतर्गत गुन्ह्यांच्या दोषसिद्धीत जानेवारी महिन्यात नागपूर ग्रामीण पोलिस पहिला क्रमांकावर असल्याचे सीआयडीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
 
 
 
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वये दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येत आहेत. यासाठी नागपूर जिल्ह्यात अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या नेतृत्वात विशेष सेल निर्माण करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व न्यायालयात नियुक्त केलेल्या पैरवी अधिकाऱ्यांची सातत्याने आढावा बैठक आयोजित करून नागपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना समन्स आणि वारंट बजावण्यात आले आहेत. त्यानुसार साक्षीदार न्यायालयात हजर होतात याची खात्री करण्यात येते. आवश्यकतेनुसार साक्षीदारांना पोलिस संरक्षण पुरविण्यात येत आहे.
 
सर्व गुन्ह्यांचा तपास गुणवत्तापूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यापूर्वी उपविभागीय आणि जिल्हा स्तरावर प्रकरणांची काटेकोरपणे छानणी करून न्यायालयात सादर करण्यात येतात. दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे आणि त्यांचे सहकारी सहकार्य करीत आहेत. सीआयडीने नुकत्याच जाहीर केलेल्या आपल्या अहवालात राज्याचे दोषसिद्धीचे प्रमाण ५०.१२ टक्के असून त्यात नागपूर ग्रामीण पोलिस दलाची टक्केवारी ७७.७९ टक्के असून त्यात नागपूर ग्रामीण पोलिस दल प्रथम क्रमांकावर आहे.