राष्ट्रीय एकता, अखंडता सर्वोपरी!
   दिनांक :26-Feb-2019
आधुनिक भारतात विचारस्वातंत्र्य आहे. ते नाही, असे जे म्हणतात, ते ढोंगी आहेत. प्रधानमंत्री चोर है, असे म्हटल्यानंतरही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, त्यांना कुणीही काही म्हणत नाही, याचा अर्थ काय? देशाच्या पंतप्रधानांना चोर संबोधल्यानंतरही तुम्ही म्हणता की देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. ज्या देशात आज सर्व प्रकारचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे, त्या देशाची बदनामी करून आपण काय साध्य करतो आहोत, याचा या ढोंग्यांनी थोडा तरी विचार केला पाहिजे. आपला विचार श्रेष्ठ आणि इतरांचा तुच्छ, या भावनेने वागणारे देशातले स्वयंघोषित पुरोगामी हे ढोंगी आहेत, हे केव्हाच सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादी विचारसरणी जोपासत काम करणारी आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला बळकटी प्रदान करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना या पुरोगाम्यांना चालत नाही, कारण ही संघटना यांच्यासारखी ढोंगी नाही. संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले होतात, केरळसारख्या राज्यात त्यांच्या हत्या होतात, तेव्हा ही पुरोगामी मंडळी काहीच बोलत नाहीत. पुरस्कार वापस तर करतच नाहीत, साधा निषेधही करीत नाहीत.
 
वैचारिक विविधता हा भारताचा अतिशय प्राचीन असा स्वभाव आहे. अगदी ऋग्वेद काळापासून देशात विचार स्वातंत्र्य असल्याचे पुरावे आढळतात. विचारशून्यतेपेक्षा विचारभिन्नता कधीही श्रेष्ठ ठरते. पण, विचार भिन्न आहेत म्हणून नेहमी एकाच विचारांवर हल्लाबोल करण्याची भारतातील स्वयंघोषित पुरोगाम्यांची कार्यशैली समर्थनीय ठरू शकत नाही. आपले विचार ज्यांना मान्य नाहीत, त्यांना प्रतिगामी म्हणायचे, त्यांचा पाणउतारा करायचा, त्यांच्याविरुद्ध विनाकारण संघर्ष छेडायचा, हा एका मोठ्या षडयंत्राचा भाग मानला पाहिजे. स्वयंघोषित पुरोगामी म्हणतात म्हणून भारतात विचारस्वातंत्र्य नाही, असे मानण्याचे कारण नाही. देशात आजही संपूर्ण विचारस्वातंत्र्य आहे. पण, त्यापेक्षाही महत्त्वाची आहे देशाची एकात्मता आणि अखंडता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगताना देशाच्या अखंडतेचा, सुरक्षेचा आणि सार्वभौमत्वाचाही विचार गांभीर्याने व्हायला नको? पण, दुर्दैवाने देशातले स्वयंघोषित पुरोगामी याचा कधीच गांभीर्याने विचार करत नाहीत, हे एकदा नव्हे, अनेकदा दिसून आले आहे. भारतीय संस्कृती, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकता याप्रति हे लोक अनुदार भूमिका घेताना दिसतात. याबद्दल त्यांना साधे टोकायचेही नाही का? याबाबतीत यांना जे कुणी टोकतील, ते लागलीच असहिष्णू ठरविले जातात, त्यांच्यावर प्रतिगामित्वाचा शिक्का मारला जातो. कुणी दिला हो तुम्हला हा अधिकार? आधी या स्वयंघोषित पुरोगाम्यांनी इतरांच्या भावनांचा, इतरांच्या विचारांचा सन्मान करायला शिकले पाहिजे. आपल्या विचारांपेक्षा भिन्न विचार असलेल्यांची भूमिका समजावून घेतली पाहिजे. आपले विचार इतरांवर थोपविण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यात अडथळा आला की देशात असहिष्णुता असल्याची आवई उठवायची, हा यांचा उद्योग आता बंद पाडण्याची वेळ आली आहे.
 
 
 
पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात आपल्या सुरक्षा दलातील ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. देशावरील हे फार मोठे संकट होते. अशा संकटसमयीसुद्धा स्वयंघोषित पुरोगामी गांभीर्याने वागत नाहीत. या वर्गात मोडणारे जे लेखक आणि स्तंभलेखक आहेत, तेसुद्धा अशा वेळी शांत चित्ताने विचार करीत नाहीत. काही राजकीय पक्षही संकटाच्या समयी सरकारची साथ न देता आपली राजकीय पोळी शेकण्याचाच विचार करतात, हे अतिशय दुर्दैवी आहे. भारतात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. त्यामुळे सरकारच्या प्रत्येक मताशी विरोधी पक्षांनी सहमत असलेच पाहिजे असे जरुरी नाही. त्यामुळे प्रसंगानुरूप सरकारच्या विरोधात बोलण्याचा विरोधी पक्षांचा अधिकार आहे. तो अमान्य करण्याचे कारण नाही. पण, वेळकाळ याचे भान ठेवून विरोधी पक्षांनी वागले पाहिजे, अशी अपेक्षा करणेही तर चुकीचे ठरणार नाही ना? पुलवामा येथील हल्ल्यानंतर संपूर्ण देश व्यथित आहे, चिंतीत आहे. जनमानसात आक्रोश आहे. पाकिस्तानविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरते आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुरक्षा दलातील जवान योग्य ती कारवाई करतील, अशी संयमित प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मोदींनी आंतरराष्ट्रीय समुदायालाही घटनाक्रमाबाबत अवगत केले आहे. पुलवामाचा हल्ला शेजारच्या पाकिस्तानने घडवून आणला आहे, यात शंकाच नाही आणि त्यामुळेच भारतात प्रचंड अस्वस्थता निर्माण होणेही स्वाभाविक आहे. एकीकडे पाकविरोधात आक्रोश आहे तर दुसरीकडे काही लोक चक्क देशविरोधी वक्तव्ये करीत आहेत, देशात विभाजनाची बीजे पेरली जातील अशी विधानं केली जात आहेत. असे असतानाही त्यांना देशात असहिष्णुतेचे वातावरण अनुभवास येत आहे. आपल्या वक्तव्यांमुळे शत्रू राष्ट्राला लाभ होईल, याचेही भान या मंडळींना राहिलेले नाही.
 
अतिरेक्यांच्या हल्ल्यात जे जवान शहीद झालेत, ते सीआरपीएफचे होते. आपल्या सुरक्षा दलात सीआरपीएफला अतिशय प्रतिष्ठेचे स्थान आहे. सुरक्षा दलात कुठेही जात, पात, धर्म, पंथ, प्रांतवाद याला थारा नसतो. मात्र, काही लोकांनी आणि वर्तमानपत्रांनीही शहीद जवानांमध्ये कोण कोणत्या जातीचा होता, याचा उल्लेख केला आहे. शहीदांनाही जातीचे लेबल लावून, एका विशिष्ट जातीला लक्ष्य बनविण्याचा करंटेपणाही या घटनेच्या निमित्ताने करण्यात आला, हे या देशाचे सगळ्यात मोठे दुर्दैव म्हटले पाहिजे. खरे तर शहीदांना जातीत वाटणे हा त्या शहीदांचा अपमान मानला पाहिजे. सुरक्षा दलात कुणाचीही जात पाहून भरती केली जात नाही आणि जातीच्या आधारावर कुणालाही प्रवेश नाकारला जात नाही. असे असतानाही काही लोक नसता उद्योग करून देशाचे रक्षण करणार्‍या सुरक्षा दलातही जात घुसवू पाहात आहेत. त्यामुळे राष्ट्रभक्त नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
 
सुरक्षा दलातले जवान हे स्वत:ला कुठल्याही जातीचे मानत नाहीत, तर ते स्वत:ला भारतीय म्हणवतात, ही आमच्यासाठी अतिशय गौरवाची बाब म्हटली पाहिजे. पण, जवानांनाही जातीत वाटणार्‍या स्वयंघोषित पुरोगाम्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रीय एकतेच्या विरोधात आहेत, असे म्हटल्यास मिरची झोंबल्याशिवाय राहणार नाही. घटना घडल्यानंतर जे भारतीय नागरिक व्यथित झाले आणि रस्त्यांवर उतरले, त्या लोकांचीही जात या स्वयंघोषित पुरोगाम्यांनी तपासली असणार अन त्याची त्यांना कोणतीही लाज वाटली नसणार, यात शंका नाही. विरोधी पक्षाच्या एका नेत्याने घटनेचा निषेध जरूर केला पण, त्याचवेळी केंद्र सरकार उन्मादी राष्ट्रवाद फैलावू पाहात असल्याचा आरोपही केला. यातूनच पाकिस्तानला बळ मिळाले अन त्या देशानेही भारतावर तसाच आरोप केला. या भारतीय नेत्याच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला आयतेच कोलीत मिळाले. सरकारवर आरोप करणे हा विरोधी पक्षांचा अधिकार असला तरी हा अधिकार कोणत्या मर्यादेपर्यंत वापरायचा, कुठल्या मुद्यांच्या संदर्भात वापरायचा, यालाही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेचे पालन झाल्याचे दुर्दैवाने दिसून आले नाही. भारतीय नागरिक असलेले कुलभूषण जाधव पाकिस्तानी कारागृहात खितपत पडले आहेत, त्याची या लोकांना चिंता नाही, हे सगळ्यात दुर्दैवी होय.