रितू फोगाट वळली एमएमएकडे
   दिनांक :26-Feb-2019
- कुस्तीची सोडली कास
चंदीगड, 
दंगल फेम कुस्ती प्रशिक्षक महावीर सिंग यांची कन्या रितू फोगाटने धक्कादायक निर्णय घेतला असून तिने कुस्तीला रामराम ठोकून मिश्र मार्शल आर्टकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. ती सिंगापूरस्थित इव्हॉलव्ह फाईट टिमशी जुळली आहे. गीता, बबिता, रितू व संगीता या प्रसिद्ध फोगाट भगिनींपैकी तिसरी २४ वर्षीय रितू हिच्या या निर्णयामुळे अ.भा. कुस्ती महासंघाला धक्का बसला आहे. २०१७ साली पोलंड येथे आयोजित विश्व २३ वर्षांखालील वरिष्ठ कुस्ती स्पर्धेत रितूने ४८ किलो वजनगटात रौप्यपदक जिंकले होते.
 
 
 
माझ्या या नवीन प्रवासाबाबत मी अतिशय रोमांचित झाली आहे. मिश्र मार्शल आर्ट निवडण्यामागचे कारण म्हणजे मी पहिली भारतीय एमएमए विश्वविजेती होऊ इच्छिते, असे रितू फोगाट सिंगापूरहून दूरध्वनीवरून बोलताना म्हणाली. रितूने दुखापतग्रस्त असल्याचे सांगून आम्हाला अंधारात ठेवले, असे अ.भा. कुस्ती महासंघाने म्हटले आहे.
 
गत काही दिवसांपासून मी एमएमएचे अनुसरण करत आहे व या खेळाने मी अतिशय प्रभावित झाली. या क्रीडाप्रकारात कुणी भारतीय कां नाही, याचे मला नेहमीच आश्चर्य वाटायचे, असेही ती म्हणाली. आमच्या परिवारात प्रत्येकजण कुस्तीपटू आहे. मी गीता व बबिताची बहीण आहे, म्हणून माझ्याकडूनही लोकांना अपेक्षा आहे, त्या आशा-अकांक्षा पूर्ण करू इच्छित आहे, परंतु मॅटवर नव्हे, तर पिंजर्‍यात खेळून, असे ती म्हणाली.