वायूदलाच्या कामगिरीवर अमरावतीकर खूष
   दिनांक :26-Feb-2019
- ठिकठिकाणी जल्लोष
 
अमरावती,
पुलवामा येथील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने आज पहाटे पाकिस्तानच्या बालाकोट येथे हवाई हल्ला करून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची शिबिरे नष्ट केली. या धाडसी कारवाईचे वृत्त अमरावतीत धडकताच राजकमल चौक व शहराच्या विवीध भागात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल याच्यासह अनेक संघटनांनी ढोल-ताशे वाजवून व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. यावेळी भारत मातेचा जयघोषही करण्यात आला.
 
 
 
आज पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान भारतीय वायुसेनेच्या मिराज-२००० या अत्याधुनिक १२ विमानांच्या मदतीने पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईचे वृत्त अमरावतीत धडकताच नागरिकांनामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या हल्ल्याची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिक उत्सुकतेने टीव्ही जवळ बसलेले होते. नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी करून हल्ल्याची माहिती जाणून घेतली.
 
 
 
या हल्ल्याचा सर्वप्रथम राजकमल चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी जल्लोष केला. यावेळी ढोल-ताशाचा निनाद करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तिरंगा व भगवे झेंडे घेऊन कार्यकर्ते भारत मातेचा जयघोष करीत होते. त्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. साईनगर परिसरातही जल्लोष झाला.