प्रत्युत्तर देण्याचा हक्क सुरक्षित : पाक
   दिनांक :26-Feb-2019
आधी नकार, मग सत्यता स्वीकारली
इस्लामाबाद,
 
भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील राज्यकर्ते, स्वत:ला शक्तिशाली म्हणविणारे लष्कर आणि आयएसआय ही गुप्तचर संस्था पूर्णपणे हादरून गेली आहे. आमची विमाने पाहून भारतीय विमानांनी मोकळ्या मैदानात बॉम्ब टाकून पळ काढला, असा दावा करणार्‍या पाकिस्तानने नंतर मात्र हल्ला झाल्याचे आणि त्यात प्रचंड नुकसान झाल्याचे मान्य केले. त्याचवेळी प्रत्युत्तर देण्याचा आमचाही अधिकार सुरक्षित असल्याच्या वल्गनाही केल्या.
 

 
या हल्ल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीची बैठक बोलावली आणि सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले. या देशाने नियंत्रण रेषा ओलांडली आहे. त्यामुळे प्रत्युत्तर देण्याचा आमचा हक्क आम्ही नक्कीच वापरणार आहोत.
तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक मेजर जनरल असिफ गफूर यांनी, भारतीय विमाने आमच्या हद्दीत येत असल्याचे लक्षात येताच आमची विमानेही तत्काळ झेपावली आणि ती पाहून भारतीय विमानांनी पळ काढला, अशा उलट्या बोंबा ठोकल्या.