श्रीदेवींचा शेवटचा चित्रपट चीनमध्ये होणार प्रदर्शित
   दिनांक :26-Feb-2019
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीं यांचा ‘मॉम’ हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट चिनी भाषेत प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

 
 
श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेला ‘मॉम’ हा शेवटचा चित्रपट होता. रवी उदयवार दिग्दर्शित हा चित्रपट जुलै २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. मुलीचा बलात्कार करणाऱ्या नराधमांचा शोध लावणाऱ्या आईची गोष्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटात श्रीदेवी यांच्या भूमिकेचं भरभरून कौतुक झालं होतं. ‘मॉम’मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही २०१८ मध्ये श्रीदेवींना प्रधान करण्यात आला होता. फेब्रुवारी २०१८ मध्ये श्रीदेवी यांचा दुबईत बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. मुख्य भूमिका असलेला ‘मॉम’ हा त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट ठरला.
 
 
 
हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओनं घेतला आहे. २२ मार्च २०१९ मध्ये हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. गेल्या वर्षभरात ‘हिचकी’, ‘हिंदी मीडिअम’, ‘बजरंगी भाईजान’ यांसारखे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले. त्यातल्या ‘हिचकी’, ‘हिंदी मीडिअम’नं तुफान कमाई चीनमध्ये केली.