कांदा बीजोत्पादन प्रक्रिया
   दिनांक :27-Feb-2019
कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर असला, तरी प्रतिहेक्टर उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच खाली लागतो. कांदा पिकवणार्‍या राज्यात क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्रप्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान हे वर्षभर म्हणजे खरीप, रांगडा, रबी व उन्हाळी हंगामात लागवडीस पोषक असते. देशाचे २५ ते ३० टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील ३७ टक्के, तर देशातील १० टक्के कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते.
 
कांदा पिकाचे बियाणे अल्पायुषी असते व त्याची उगवणक्षमता ही एक वर्षापुरतीच टिकून राहते. त्यामुळे कांदा बियाण्याचे उत्पादन दरवर्षी घ्यावे लागते. कांदा बियाण्याच्या उत्पादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या वर्षी मूलभूत िंकवा पैदासकार बियाण्यापासून मातृकंद तयार करावीत. नंतर दुसर्‍या वर्षी या मातृकंदापासून बियाणे उत्पादन कार्यक्रम घ्यावा.
 
जमीन व हवामान : कांदा बीजोत्पादनाच्या दृष्टीने तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. कंद लावल्यापासून ते दांडे निघेपर्यंत थंड हवामान हवे असते. मलधारणा ते बी तयार होण्याचा काळ हा एक ते दीड महिन्याचा असतो. या काळात रात्रीचे तापमान १५ ते २० अंश व दिवसाचे तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर राहिल्यास वाढ चांगली होते व बी लवकर तयार होते. मधमाश्यांचा वापर केल्यास पराग सिंचन होऊन बीजोत्पादन चांगले होते. पराग सिंचन चांगले झाले, तापमान चांगले राहिले, खते व पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले तर बियाण्याचे चांगले उत्पादन मिळते. बीजोत्पादनासाठी मध्यम ते भारी जमीन निवडावी. भारी, कसदार जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे पिकाला गारवा मिळतो आणि बियाण्याचे अधिक उत्पादन मिळते.

 
 
कांदा बीजोत्पादनाच्या पद्धती :
  1. रोप कायम जागी लावून : या पद्धतीमध्ये प्रथम रोपवाटिकेत कांद्याची रोपे तयार करून त्यांची मुख्य शेतात लागवड करतात. त्यानंतर कांदा तयार झाल्यानंतर काढणी न करता तसाच शेतात ठेवला जातो. या कांद्यातून फुलोर्‍याचे दांडे येतात व त्याला बी लागते. या पद्धतीत खर्च कमी लागतो व वेळदेखील वाचतो, परंतु बीजोत्पादनाची ही पद्धत आपल्याकडे उपयोगात आणली जात नाही.
  2. कंदापासून बियाण्याची पद्धत : या पद्धतीमध्ये कंद तयार झाल्यानंतर काढून घेतात व चांगल्या रीतीने निवडून पुन्हा शेतात लागवड करतात. यामुळे कंदाची योग्य निवdड शक्य होते. शुद्ध बियाणे तयार होऊन उत्पन्नदेखील जास्त प्रमाणात येते. या पद्धतीत खर्च वाढतो व वेळदेखील जास्त लागतो. तथापि, बीजोत्पादनासाठी हीच पद्धत योग्य आहे.
अ) एकवर्षीय पद्धत : या पद्धतीमध्ये मे-जून महिन्यात पेरणी करून जुलै-ऑगस्टमध्ये रोपांची पुनर्लागवड करतात. साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात कंद तयार होतात. कंद काढून निवडून घेतले जातात. चांगल्या कंदाची 10-15 दिवसांनंतर पुन्हा दुसर्‍या शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे मे महिन्यापर्यंत बियाणे तयार होते. एक वर्षात बियाणे तयार झाल्याने यास एकवर्षीय पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये कांदा साठवून ठेवण्याचा खर्च व साठवणुकीत होणारे नुकसान टाळता येते. या पद्धतीने खरीप कांद्याच्या प्रजातींचे बीजोत्पादन घेतात.
 
ब) द्विवर्षीय पद्धत : या पद्धतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बियाणे पेरावे व रोपे डिसेंबरच्या शेवटी िंकवा जानेवारीच्या सुरुवातीस शेतात लावावे. मे महिन्यापर्यंत कांदे तयार होतात. निवडलेले कांदे ऑक्टोबरपर्यंत व्यवस्थित साठवून ठेवावेत. नोव्हेंबरमध्ये पुन्हा मध्यम आकाराचे व बारीक मानेचे कांदे निवडून चांगल्या कंदाची शेतात लागवड करतात. या पद्धतीमुळे बियाणे तयार होण्यासाठी जवळपास दीड ते दोन वर्षे वेळ लागतो. म्हणून यास द्विवर्षीय पद्धत म्हणतात. या पद्धतीत रबी कांद्याच्या वाणांचे बीजोत्पादन करतात.
•  सोनाली र. वानखडे
• डॉ. ए. ए. चौधरी
• जी.व्ही. कराळे
कृषी संशोधन केंद्र, अचलपूर