सौंगंध मुझे इस मिट्टी की...
   दिनांक :27-Feb-2019
क्षमता असणे म्हणजे मेंदू तल्लख आणि शरीर सुदृढ असणे, असा होतो. मग मन निग‘ही असतं आणि शांतही... क्षमता असली की ती व्यक्ती हलून जात नाही आणि हादरतही नाही. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींवर विरोधकांनी, नगर पेटलं असताना राजा शीळ घालत होता, अशी टीका केली. ऐन पेपरच्या आधी एखादा विद्यार्थी मैदानावर खेळताना दिसला की कुणाच्याही पोटात उगाच कालवाकालव होते, तशीच आताही झाली होती. ‘नापासच होणार हा!’ अशी संभावना केलेला तोच विद्यार्थी गुणवत्ता यादीत दिसला की जसे होते, तसेच आता पाकव्याप्त काश्मिरात घुसून भारतीय हवाईदलानं हल्ला केला अन्‌ ‘जैश-ए-महम्मद’च्या बालाकोट, चाकोटी आणि मुझफ्फराबाद परिसरातल दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तसे आता विरोधकांचे झाले आहे. खरेतर हा क्षण आणि एकुणातच परिस्थिती अंतर्गत राजकारणाचे संदर्भ देत चर्चा करण्याची अजिबातच नाही.
 
 
 
पंतप्रधान मोदी यांनी या दोन्ही आघाड्या अत्यंत निष्णात चतुराईने वेगळ्या ठेवल्या आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर त्यांनी आपले कुठलेही कार्यक‘म रद्द केले नव्हते त्यामागे एकच कारण होतं की शत्रूला हे दाखवून द्यायचं होतं की तुमच्या या कुटील कारस्थानानं आम्ही हलून गेलेलो नाही. भारतात अगदी सामान्य स्थिती आहे, असं दिसत असताना हल्लेखोर पाकिस्तानच गडबडला होता. जे कमकुवत असतात ते घाबरट असतात. गाफिल नाही आम्ही, हेही भारताला दाखवून द्यायचं होतं. वरवर निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आहे, असे वाटणारे पंतप्रधानांचे दौरे खरेतर अशा स्थितीत देशवासीयांशी थेट संवाद साधण्याचे अन्‌ त्यांना धीर देण्याचे अनौपचारिक माध्यम होते. थेट जनतेत जाऊन त्यांनी सांगितले होते, आम्ही लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. गुन्हेगारांना शासन होईल, नक्की होईल, मात्र कधी, कुठे आणि कसे त्याचा निर्णय लष्करच घेईल... कुठल्याही गोष्टीचे कायम राजकारण आणि केवळ सत्तेचेच राजकारण करणार्‍यांना त्यांची ही भाषा आणि शैलीही कळली नाही. ते त्यावर टीका करत राहिले, मात्र जनतेला त्यांची ही ‘मन की बात’ वाचण्याचे अन्‌ समजून घेण्याचे कसब आता साध्य झालेले आहे. त्यामुळे जनतेच्या मनातला दाह शांत झाला आणि मग नेमक्या वेळी ठरलेल्या मुहूर्तानुसार भारतीय वायुसेनेने करामत दाखविली.
 
मागच्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा हा मोठा टप्पा आहे. हवाईदलांनी पाकिस्तानच्या हद्दीत थेट 40 किलोमीटर आत शिरून दहशतवादी संघटनेचे तीन तळ उद्‌ध्वस्त केले. नेमक्या व्याधिग‘स्त स्थळावर जाऊन रोगाची शल्यक्रिया करायची म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. खरेतर असाच सर्जिकल स्ट्राईक कारगीलच्या वेळीही योजण्यात आला होता. एअरचीफ मार्शल टिपणीस यांनी संपूर्ण योजना तयार करून तत्कालीत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना परवानगी मागितली होती. मात्र, त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिटंन यांनी, तुम्ही हे युद्ध जिंकला आहात. आणखी आघाडी कशाला घेता, असे म्हटले आणि वाजपयींनाही ते पटले त्यामुळे त्यावेळी असा हल्ला थांबविण्यात आला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय समुदायाचे मत तयार करण्यासाठीदेखील वेळ नव्हता. ते काम मोदींनी गेल्या जवळपास पाच वर्षांत करून ठेवले आहे. मशागत करून ठेवलेली असली की मग पेरणी कधीही करता येते, हे तत्व होते. त्यासाठी त्यांनी जगभर दौरे केले. त्याचेही केवळ अंतर्गत राजकारणाचा चष्मा लावूनच समीक्षण करण्यात आले. आता त्यांच्या या संपर्काचे फलित दिसते आहे. असले सर्जिकल स्ट्राईक काही एकाएकी करता येत नाहीत. परीक्षेच्या आधी मेंदू ताजा ठेवण्यासाठी खेळायचे असेल तर वर्षभर निष्ठेने अन्‌ संयमाने अभ्यास केलेला असला पाहिजे... म्हणूनच लष्कर योजना तयार करत असताना मोदी जनतेच्या दुखर्‍या जागांवर आपुलकीची फुंकर घालत होते. सांगत होते-
 
‘सौगंध मुझे इस मिट्टी की, मै देश नहीं झुकने दूंगा
मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं रुकने दूंगा
मेरा वचन है भारत मां को, तेरा शीश झुकने नहीं दूंगा...
जाग रहा हैं देश मेरा, हर भारतवासी जितेगा
सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नही झुकने दूंगा.’
 
पुलवामा हल्ल्यानंतर वेगाने हालचाली होत होत्या. वरवर सारेच शांत दिसत असले तरीही असल्या योजनांच्या काही ब्रेकिंग न्यूज करायच्या नसतात. गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री तडा‘याने कामाला लागले होते. मोदी तर शुभारंभ करत फिरत आहेत, म्हणून विरोधक टीका करत होते आणि शत्रू गालीफ होता. अफजल खानाचे पोट फाडण्याच्या आधी शिवाजी महाराजही असेच शांत होते. खान गालिफ राहिला अन्‌ महाराजांनी त्याचा कोथळाच बाहेर काढला. इम्रान खानचेही तसेच झाले.
 
शुक्रवार, दिनांक २२ फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या व्यापारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर पत्रपरिषदेत बोलताना म्हणाले, पुलवामा येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर खंबीर उत्तर देण्याची तयारी भारत करत आहे. भारताला स्वसंरक्षणाचा हक्क आहे, हेही त्यांनी सांगून टाकले. शुक्रवार, दिनांक २२ फेब्रुवारी : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला. सदर ठरावात जैश ए मोहंमद या संघटनेचं नाव नमूद करण्यात आलं. पाकिस्तानने अशा संघटनांना थारा देऊ नये आणि पाकिस्तानने भारताला यासंबंधात सहकार्य करावं असंही सदर ठरवात नोंदवलं आहे. हा ठराव करण्याआधी प्रदीर्घकाळ वाटाघाटी सुरू होत्या. हा ठराव संमत करण्यासाठी चीनने अधिक वेळ मागून घेतला होता. मात्र चीनची मागणी मान्य झाली नाही. सदर ठराव एकमताने पारित करण्यात आला.
 
दरम्यानच्या काळात सौदीचे युवराज महम्मद बीन सलमान भारतात येऊन गेले आणि त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. त्याकडे भारतीय माध्यमांचं फारसं लक्ष गेलं नाही. ते म्हणाले की पाकिस्तानची निर्मिती अलिकडच्या काळातली आहे. भारत आणि त्यातला काश्मीर हे प्राचीन आहेत. त्यामुळे काश्मिरवर पाकिस्तान अधिकार सांगूच शकत नाही... ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन या इस्लामिक देशांच्या संघटनेने भारताला प्रथमच पाहुणा म्हणून पाचारण केले. त्यातही दहशतवादाचा निषेध करण्यात आला. या दोन घटनांचं सविस्तर रिपोर्टिंग भारतातील प्रसारमाध्यमांनी अपवादानेच केलं. भारतीय प्रसारमाध्यमांचा भर मोदी विरोध, मोदी समर्थन, देशभक्ती, पाकिस्तान विरोध यावरच होता व आजही आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे असं सांगतात, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे असंही बजावतात, संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद पाकिस्तानला सौम्य शब्दात समज देते. हे पहिल्यांदाच घडलं आहे... हे सहज घडलेलं नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत धोरणीपणे मोदींनी आघाडी घेतली. नवे मित्र जोडले. अगदी शत्रू नाही पण विरोधक देशांनाही भेट दिली तर त्यांचा विरोध मवाळ होतो. क्षणी तो मैत्रीकडे मार्गक्रमणही करतो... हे दिसून आले.
 
मुंबईवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आले होते. ताजमहाल हॉटेलला त्यांनी भेटही दिली. दहशतवादाचा धिक्कार करताना त्यांनी पाकिस्तानचं नाव घेणं टाळलं. आता परिस्थिती अचानक बदललेली नाही. भारतीय हवाईदलाने ही कारवाई करण्याच्या आधी आंतरराष्ट्रीय समुदायाला सचेत करण्यात आलं होतं, हे वेगळ्याने सांगण्याची काहीच गरज नाही. फ्रान्स, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांनी पाकिस्तानला समज देण्याचीच भूमिका घेतली. आजच्या स्थितीत पाकिस्तानसोबत अगदी इस्लामिक देशही नाहीत. इस्लामच्या अगतिकतेने ते ते पाकिस्तानला समज देणार नाहीत किंवा  त्यांची आर्थिक कोंडीही ते करू शकत नाहीत, मात्र त्यांचे पाकला असलेले समर्थन क्षीण झालेले आहे, हे नक्की. चीनचीदेखील बर्‍यापैकी कोंडी करण्यात भारताला यश आलेले आहे.
 
एकतर पाकिस्तानने आता पुलवामा प्रकरणी जी काय आगळीक केली ती करण्याच्या आधी चीनला विश्वासात घेतले नव्हते. घेतले असते तर त्यांनी पाकिस्तानला समजावले असते की सध्याची आंतरराष्ट्रीय स्थिती पाहता आता हे असले उद्योग करू नका. चीनलादेखील पाकिस्तानबद्दल खास असे ममत्व नाही. दक्षिण एशियामध्ये चीनला वर्चस्व हवे आहे. पाकव्याप्त काश्मिरातून त्यांना इकॉनॉमिक कॉरिडॉर करायचा आहे. भारताच्या सहकार्‍याशिवाय त्यांना ते शक्य नाही, याचीही जाणीव चीनला आहे. त्यामुळे भारत आता आक‘मक झाल्यावर चीनने अत्यंत सावध अशी भूमिका घेतली आहे. भारत आणि पाकिस्तानने संयम बाळगावा, अशी शहाजोगपणाची भूमिका चीनने घेतली आहे. तरीही भारताने सावध राहणे अत्यंत गरजचे आहे. ते सांगण्याची गरज नाही. हवाई स्ट्राईक करण्याच्या आधीच त्याचे काय पडसाद उमटू शकतात, याचीही पुरेपूर कल्पना करण्यात आलेली आहे.
 
पाकिस्तानची अवस्था मात्र अत्यंत अवडघल्यागत झालेली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर लांच्छन लागलेले हे लाजीरवाणे ध्यान ते घेऊन जाऊ शकत नाहीत. केवळ कोल्हेकुईच करू शकतात. पाकिस्तानची जनता मात्र संतापली आहे. इम्रान खान हे तिथल्या लष्कराच्या हातचे कळसुत्री बाहुले आहेत. त्यांना काठावर बुहमत आहे आणि विरोधी खासदारांच्या धुमसण्याचा धूर त्यांच्या संसदेतून निघू लागला आहे. पाकिस्तानच्या संसदेत ‘शेम, शेम’ ज्या उमटलेल्या घोषणा इम्रान खान यांना जिव्हारी लागणार्‍याच होत्या. युद्ध करूच शकत नाहीत अन्‌ केलेच तर काय होणार हे कारगीलने दाखवून दिले आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थितीही अत्यंत हलाखीची आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाची साधी सहानुभूतीही नाही. चीनदेखील युद्धात त्याला मदत करणार नाही. कारगीलची खाज ज्यांनी काढली होती ते मुशर्रफच आता सांगत आहेत, भारताशी युद्धाचा विचारही करू नका...तुम्ही एक अण्वस्त्र वापराल तर भारत २० अण्वस्त्रे वापरेल. पाकिस्तान बरबाद होऊन जाईल...
 
याचं कारण आहे. आज भारतीय सैन्य जेवढं सक्षम आहे तेवढंच ते वाजपेयी व डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातही होतं. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल नव्हती. भारताने एक चपराक हाणली आहे. भारतीय विमानांना आम्ही पळवून लावले, असे पाकिस्तानला देशांतर्गत रोष कमी करण्यासाठी म्हणावेच लागणार आहे. बॉम्ब नेमक्या ठिकाणी पडलेच नाहीत, असे त्यांचे म्हणणे अतांत्रिक आहे. जार्ज फर्नाडिस संरक्षणमंत्री असताना त्यांनी इस्रायलवरून बॉम्बच्या लेजर गायडेड कीट मागविल्या होत्या. त्यात टार्गेटचे अक्षांश- रेखांश फीड केले की विमानातून रिलीज केलेले बॉम्ब आपल्या लक्ष्यावरच जाऊन पडत असतात. युद्धासाठी नीती, योजना, प्रणाली या तिन्हींचा संगम असला पाहिजे. भारताने तो केला आहे. पाकिस्तानला माहिती आहे की थेट युद्धात भारताला पराभूत करताच येणार नाही. त्यामुळे त्यांनी शत्रूच्या अंगावर शंभर जखमा करण्याचे दहशतवादी तंत्र अवलंबिले. त्यावर सर्जिकल स्ट्राईक हाच अक्सीर इलाज होता. स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतिदिनीच हे करण्यात आले, हा निव्वळ योगायोग की योजनेचा भाग, ते सांगता यायचे नाही; पण त्यामुळे भारतीय जन सागराचा तळमळलेला प्राण मात्र शांत झाला आहे.