वर्ध्यात मराठी राजभाषा दिन उत्साहात
   दिनांक :27-Feb-2019
बसस्थानक परिसरात आयोजन
 
 
हिंगणघाट,
गेल्या हजार वर्ष्यात अनेक आक्रमणे झेलून आणि सोसून मराठी भाषा जेथे जेथे मराठी माणूस आहे, तिथे तिथे ताठ मानेने नांदते आहे. हा भाषेचा स्वाभिमान जगाला सांगण्याचा हा दिन आहे असे मत बिडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा. रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केले. ते येथील बस स्थानक परिसरात आयोजित मराठी राजभाषा दिन कार्यक्रमात बोलत होते.
 
कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार प्रमुख संजय घुसे तर उदघाटक म्हणून डॉ प्रा रवींद्र ठाकरे, तसेच युवा साहित्यिक ,प्रा. अभिजित डाखोरे, बस स्थानक प्रमुख नंदकिशोर मसराम, लेखाकार तायडे यांची विशेष उपस्थिती होती.
 
 

 
मराठी भाषा ही अतिशय प्राचीन असून तिला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळेल अशी भावना व्यक्त करीत अभिजित डाखोरे यांनी विडंबन सादर करीत मराठी भाषेच्या गमती जमती सांगितल्या व कुसुमाग्रजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रस्ताविकातून लेखाकार तायडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजन मागील भूमिका विशद केली. अध्यक्षीय भाषणातून घुसे यांनी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे व ती आपण पार पाडू अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाला विविध शाळांचे विद्यार्थी, प्रवाशी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.