बेपत्ता दहा वर्षीय सुमितचा मृतदेह आढळला
   दिनांक :27-Feb-2019
वाशीम, 
दोन दिवसापासून बेपत्ता झालेल्या सुमित रामेश्‍वर आरु (वय १०) या बालकाचा गावालगतच्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर बालकाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याचे बोलल्या जात असून, याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेवून पुढील चौकशी सुरु केली आहे.
 
 
 
फिर्यादी काशीनाथ रघुजी आरु रा. रिठद यांनी वाशीम ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, त्यांचा नातू सुमित रामेश्‍वर आरु हा २४ फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान घरातून बाहेर पडला, त्यानंतर तो घरी परत आला नाही. त्याचे एका अज्ञात इसमाने अपहरण केले. अशा फिर्यादीवरुन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. दोन दिवस सर्वत्र शोधाशोध घेऊनही सुमितचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर आज सुमितचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत तरंगत्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. सुमितचे अपहरण करुन जीवे मारण्यामागचे कारण काय? याबाबतचा पुढील तपास पीएसआय मानेकर हे करीत आहेत.