पाकिस्तानी कलाकारांचा व्हिसा नाकारा, पंतप्रधानांना पत्र
   दिनांक :27-Feb-2019
पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूडकरांनीही आपली नाराजी व्यक्त केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणीही 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने' केली. बंदीनंतर आता पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा नाकारण्यात यावा अशी नवी मागणी एआयसीडब्ल्यूए तर्फे करण्यात आली आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीत एआयसीडब्ल्यूए ने ही मागणी केली आहे. 'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा आम्ही निर्णय यापूर्वी घेतला आहे. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी काही कठोर पावले सरकराने उचलावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे, पाकिस्तानी कलाकार, फिल्म एसोसिएशन आणि माध्यम प्रतिनिधी यापैकी कोणालाही व्हिसा मिळणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत. मंगळवारी भारतीय वायू सेनेने केलेली कारवाई खरंच कौतुकास्पद आहे. आम्हाला आपल्या लष्कराचा अभिमान आहे. आमच्यासाठी देश पहिला आहे आणि हा आमचा नवा भारत आहे ' असेही त्यांनी पत्रात लिहिले आहे.