दुसरा सामनाही ऑस्ट्रेलियाने जिंकला; टी-२० मालिका खिश्यात
   दिनांक :27-Feb-2019
- दुसर्‍या सामन्यातही भारताचा पराभव
- ग्लेन मॅक्सवेलचे ५० चेंडूत शतक
बंगळुरू,
ग्लेन मॅक्सवेलच्या दणकेबाज शतकाच्या बळावर पाहुण्या ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या टी-20 सामन्यात भारतावर 7 गड्यांनी मात करून दोन सामन्यांची टी-20 मालिका 2-0 ने जिंकली. भारताने विजयासाठी ठेवलेले 191 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकात 3 गडी गमावत 194 धावा काढून गाठले. मॅक्सवेलने चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाचा विजय साकार केला.
 
 
विजयासाठी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला प्रारंभीच दोन हादरे बसले. सिद्धार्थने सामन्याच्या तिसर्‍या व आपल्या पहिल्याच षटकातील दुसर्‍या चेंडूवर मार्कस स्टोइनिसचा त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर अष्टपैलू विजय शंकरने कर्णधार फिंचला (8) धवनकडून झेलबाद केले. अशा रीतिने ऑस्ट्रेलियाने चार षटकात 22 धावात दोन महत्त्वपूर्ण फलंदाज गमावले. मात्र त्यानंतर शॉर्ट व ग्लेन मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजीचा धैर्याने सामना करत संघाला 95 धावांचा टप्पा गाठून दिला. त्यावेळी शंकरने शॉर्टच्या रूपाने दुसरा बळी टिपला. मॅक्सवेलने पीटर हॅण्ड्‌सकॉम्बच्या साथीने एक बाजू सांभाळत आपले शतक साजरे केले व संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मॅक्सवेलने 50 चेंडूत 6 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या व संघाला 18.1 षटकात 3 बाद 178 धावांचा पल्ला गाठून दिला. त्यानंतर मॅक्सवेल व हॅण्ड्‌सकॉम्बने नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला.
 

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने रोहित शर्माला विश्रांती दिली असून त्याच्या जागी लोकेश राहुलने शिखर धवनच्या साथीने 61 धावांची सलामी भागीदारी करून भारताच्या डावाची झकास सुरुवात केली. राहुलने 26 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारांसह 47 धावा काढल्या. विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेसा खेळी करत 38 चेंडूत 2 चौकार व 6 षट्‌कारांसह नाबाद 72 धावांची खेळी केली. माजी कर्णधार महेंद्रिंसह धोनीने 23 चेंडूत प्रत्येकी तीन चौकार व षटकारांसह 40 धावांचे योगदान दिले. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 100 धावांची भागीदारी केली. भारताने उमेश यादवच्या जागी सिद्धार्थ कौलला, तर लेगस्पिनर मयंक मार्कंडेच्या जागी अष्टपैलू विजय शंकरला संधी दिली.
 
कोहलीचे षट्‌कारांचे अर्धशतक
विराट कोहलीने 29 चेंडूत एक चौकार व 4 षट्‌कारांच्या मदतीने आपले अर्धशतक साजरे केले. 16 व्या षटकात नॅथन काऊल्टर-नाईलच्या गोलंदाजीत कोहलीने लागोपाठ 3 षटकार हाणले. टी-20 कि‘केटमध्ये 50 षट्‌कार ठोकणारा विराट कोहली पाचवा भारतीय ठरला. युवराज सिंग, सुरेश रैना व वीरेंद्र सेहवाग व महेंद्रिंसह धोनी यांच्यानंतर कोहली षटकारांचे अर्धशतक पूर्ण करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला.