क्रुझर दुचाकीला धडक देत पलटली, १८ जखमी
   दिनांक :27-Feb-2019
-वायगाव ( ह) शिवारातील घटना
 
 
 
समुद्रपूर,
भरधाव जाणाऱ्या चारचाकी प्रवासी वाहतुक करणाऱ्या क्रुझर गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक देत रस्त्याच्या बाजूला पलटली. यामध्ये गाडीमधील १६ प्रवासी जखमी झाले तर दुचाकीस्वार शिक्षक व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. ही घटना आज सायं ५.३० वाजताच्या दरम्यान घडली.
 
 
 
प्रवासी वाहतुक करणारी चारचाकी क्रमांक एम.एच. २७ एसी ४५३३ क्रुझर गाडी समुद्रपूरवरून प्रवासी भरून गिरडकडे जात होती. वायगाव ( हळद्या ) शिवारात क्रुझरचे एक दार अचानक उघडल्या गेल्याने अनियंत्रित झाली. त्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३२व्ही ०२१४ ला धडक देत बाजूच्या नालीत पलटली. गाडीतील १६ जण तसेच, दुचाकीस्वार शिक्षक दयाराम घुमडे व पत्नी रिणा घुमडे असे एकूण १८ जण गंभीर जखमी आहेत. क्रुझर गाडीतील जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देत सेवाग्राम येथील कस्तुरबा रूग्णालयात पुढील उपचारा करिता पाठविण्यात आले असून दोघा दुचाकीस्वारांना नागपूर येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.