एअरस्ट्राईकने पाकिस्तानी शेअर बाजार कोसळला
   दिनांक :27-Feb-2019
मुंबई:
भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेली तणावाच्या परिस्थितीमुळे पाकिस्तानातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक केएसई 100 निर्देशांक सध्या 1,168.64 अंशांनी कोसळला असून तो 37 हजार 653 अंशांवर व्यवहार करत होता. तर सकाळच्या क्षेत्रात 1481 अंशांनी कोसळला होता. पाकिस्तानी वृत्तसंस्था 'द डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार ही गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक मोठी घसरण आहे.
 
 
भारतीय शेअर बाजारात देखील सकाळच्या सत्रात घसरण झाली होती. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 500 अंशांनी घसरत 35 हजार 735.33 अंशांची नीचांकी पातळी गाठली. आता मात्र सेन्सेक्स सावरला असून तो 121.67 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 852.04 अंशांवर व्यवहार करतो आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 48.95 अंशांच्या घसरणीसह 10 हजार 786.35 अंशावर व्यवहार करतो आहे.
सध्या मुंबई शेअर बाजारात बजाज ऑटो, सन फार्मा, एनटीपीसी, यूपीएल आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहेत. तर विप्रो, टाटा मोटर्स
बीपीसीएल आणि इन्फ्राटेलच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे