मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करण्याचा अमेरिका, फ्रान्सचा सुरक्षा परिषदेसमोर प्रस्ताव
   दिनांक :28-Feb-2019
न्यूयॉर्क,
संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. अमेरिका, फ्रान्स व  ब्रिटनकडून याबाबतचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये मंजूर करण्यात आला. तसेच मसूदवर प्रवासबंदी, शस्त्रबंदी आणि संपत्ती जप्तीची कारवाई करण्याची मागणीही या देशांनी केली आहे. 
 
 
 
मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर फ्रान्स काम करीत आहे. पुढील महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद ग्रहण केल्यानंतर हा प्रस्ताव फ्रान्स निर्बंध समितीत मांडू शकेल. सुरक्षा परिषदेचा फ्रान्स हा स्थायी सदस्य असून, त्याला नकाराधिकार ( व्हिटो ) आहे. मसूद अझहर याच्यावर बंदी घातली जावी, अशा प्रस्तावावर फ्रान्स काम करीत असे सूत्रांनी सांगितले. तसेच मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करण्यात आली असून तसा प्रस्तावही संयुक्त राष्ट्रात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता, या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र काय भूमिका घेणार याकडे जगातील बहुतांश देशांचे लक्ष्य लागले आहे.
कंदाहार विमान अपहरणामुळे भारतात मसूद अझहर हा दहशतवादी प्रसिद्ध झाला. इंडियन एअरलाइन्सच्या काठमांडूहून दिल्लीकडे येणाऱ्या IC 814 विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी अपहरण झाले होते. त्या विमानातील १७८ प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात भारताने मसूद अझहर, अहमद उमर सईद शेख आणि मुश्ताक झरगार या तीन दहशतवाद्यांची सुटका केली होती. त्याच्या एक वर्षानंतरच जम्मू-काश्मीर विधानसभेच्या इमारतीत विस्फोटकांनी भरलेले वाहन घुसवून हल्ला करण्यात आला होता. यासोबतच अनेक दहशतवादी कारवायांमध्ये मसूदचा हात होता.