उद्यापासून दहावीची परीक्षा
   दिनांक :28-Feb-2019

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा उद्यापासून (१ मार्च) सुरू होत आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे. जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अखेरची संधी ठरणार असून, नव्या अभ्यासक्रमाची ही पहिलीच परीक्षा आहे.

 

 
 

शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मराठीच्या परीक्षेला सुरुवात होईल. परीक्षेतील कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी विभागात शिक्षण मंडळातर्फे भरारी पथकांची परीक्षा केंद्रांवर नजर राहणार आहे. राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी ही माहिती दिली. राज्यभरातील ४ हजार ८७४ केंद्रांवर परीक्षा होईल. २२ हजार २४४ शाळांतील नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमाचे मिळून १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यात ७ लाख ७२ हजार ८४२ विद्यार्थिनी, ९ लाख २७ हजार ८२२ विद्यार्थी, ८ हजार ८३० दिव्यांग विद्यार्थी आहेत.

 

जुन्या अभ्यासक्रमाचे ५९ हजार २४५ विद्यार्थी आहेत. 
कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी २५२ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा कक्षात उपस्थित राहाणे आवश्यक आहे, असे डॉ. काळे यांनी सांगितले.

 

गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थीसंख्या घटली
गेल्या वर्षी १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणारे विद्यार्थी ५० हजार ५४० ने घटले आहेत.