भारताने कापले पाकचे नाक
   दिनांक :28-Feb-2019
 दिल्ली वार्तापत्र 
श्यामकांत जहागीरदार  
  
भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथे घुसून ‘जैश ए मोहम्मद’ या कुख्यात अतिरेकी संघटनेचा तळच उद्ध्वस्त केला नाही, तर खर्‍या अर्थाने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. सोमवारच्या रात्री भारताने मिराज 2000 या विमानांच्या साह्याने केलेल्या हल्ल्यात जवळपास 350 अतिरेकी मारल्या गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लढाईत पहिल्यांदा भारतीय वायुसेनेची विमाने पाकिस्तानात घुसली होती. त्यानंतर जवळपास 48 वर्षानी दुसर्‍यांदा वायुसेनेच्या विमानांनी पाकिस्तानात घुसून बॉम्बहल्ला केला.
 
भारतीय वायुसेनेने बालाकोट येथील ‘जैश ए मोहम्मद’च्या तळावर घुसून केलेली कारवाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आठवण करुन देणारी आहे. आज आम्ही ज्याचा सर्जिकल स्ट्राईक म्हणून उल्लेख करतो, तो शिवाजी महाराजांचा गनिमी कावाच आहे. बेसावध असलेल्या शत्रूवर आकस्मिक हल्ला चढवत त्याचे नुकसान करत, पण आपले नुकसान होऊ न देता सुखरूप परत येणे म्हणजे गनिमी कावा होय. पुण्यातील शनिवारवाड्यात शाहिस्तेखानाने आपल्या हजारो सैनिकांसह तळ ठोकला होता. त्यावेळी एका रात्री मोजक्या सैनिकांसह शिवाजी महाराजांनी शनिवारवाड्यात घुसून शाहिस्तेखानाच्या फौजेची दाणादाण उडवली होती. खुद्द शाहिस्तेखानाला आपला जीव वाचवताना आपली दोन बोटे गमवावी लागली होती. त्यावेळच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये शाहिस्तेखानाला आपली दोन बोटे गमवावी लागली होती, तर आज भारताने बालाकोट येथे केलेल्या कारवाईने पाकिस्तानचे नाक कापले गेले आहे.
 

 
 
पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात चाळीसच्यावर जवान शहीद झाले. या आत्मघातकी अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी तात्काळ ‘जैश ए मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेने स्वीकारली. त्यावेळी आपल्या या कृत्याचा काय परिणाम होईल, या घटनेवर भारताची प्रतिक्रिया कशी राहील, याचा अंदाज ‘जैश ए मोहम्मद’ तसेच त्याच्या पाकिस्तानी म्होरक्यांनाही आला नाही. ‘जैश ए मोहम्मद’ आणि ‘लष्कर ए तोयबा’ सारख्या भारतात अतिरेकी कारवाया करणार्‍या संघटनांना पाकिस्तानचे साह्य आहे, हे आता लपून राहिलेले नाही.
 
पुलवामा येथील शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आश्वस्त केले होते. बालाकोट येथील ‘जैश ए मोहम्मद’चा प्रशिक्षणतळ उद्ध्वस्त करत मोदी यांनी आपली छाती 56 इंची असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.भारत पुलवामा येथील घटनेचा निश्चितच बदला घेईल, असे मानले जात होते. पण त्याचे स्वरूप कसे राहील याबाबत वेगवेगळे अंदाज केले जात होते.
 
जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार याच्या एक गाजलेल्या संवादाची मोदींच्या या कारवाईने आठवण झाली. ‘हम तुम्हे मारेंगे, जरूर मारेंगे, लेकिन वो बंदुक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी, और वक्त भी हमारा होगा, बस जमीन तुम्हारी होगी’, हा राजकुमार यांचा संवाद मोदी यांनी शंभर टक्के खरा करून दाखवला. भारत अशी काही कारवाई करेल, याचा अंदाजच पाकिस्तानला आला नाही.
 
सर्वात महत्वाचे म्हणजे भारताने ही कारवाई करताना आपल्या मुत्सद्देगिरीचे जे दर्शन घडवले, त्याला तोड नाही. पुलवामा येथील घटनेची माहिती भारताने संयुक्त राष्ट्रतील स्थायी सदस्य असलेल्या देशांसोबत जगातील अन्य प्रमुख देशांना दिली होती. यातून पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार भारताने अबाधित ठेवला होता. आपण पाकिस्तानविरुद्ध कारवाई करणार याची जाणीवही भारताने अमेरिकेसह अन्य देशांना दिली होती. यावेळी भारताने पाकिस्तानची पूर्ण नाकेबंदी केली. ‘जैश ए मोहम्मद’ तसेच ‘लष्कर ए तोयबा’ सारख्या संघटनांना पाकिस्तानचा राजाश्रय आहे, हे सर्वश्रृत आहे. पाकिस्तानी लष्कर तसेच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या पािंठब्यामुळेच या दोन्ही संस्था भारतात आत्मघाती कारवाया करत होत्या. एकीकडे या अतिरेकी संघटनांना पूर्णपणे मदत करायची, मात्र जाहीरपणे या संघटना पाकिस्तानात असल्याचे नाकारायचे, असा पाकिस्तानचा दुटप्पीपणाच त्याच्या अंगलट आला.
 
‘जैश ए मोहम्मद’ तसेच ‘लष्कर ए तोयबा’ या संघटनाचे प्रशिक्षणतळ पाकव्याप्त काश्मिरात तसेच पाकिस्तानात असल्याचे भरभक्कम पुरावे भारताने वेळोवेळी पाकिस्तानला दिले होते. मात्र प्रत्येकवेळी पाकिस्तानने त्याचा इन्कार केला. याचा फायदा भारताने दुसरा सर्जिकल स्ट्राईक करताना घेतला. बालाकोट येथील ‘जैश ए मोहम्मद’च्या प्रशिक्षण तळावर वायुसेनेच्या विमानांनी सोमवारच्या रात्री बॉम्बवर्षाव करत ते उदध्वस्त केले. विशेष म्हणजे भारताने ही कारवाई करताना पाकिस्तानच्या नागरी वस्त्या तसेच लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला होणार नाही, याची काळजी घेतली.
 
वायुसेनेच्या विमानांनी उड्डाण करताना आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेतली. दोन देशांतील आकाशातील सीमांच्या मधल्या जागेतून या विमानांनी उड्डाण केले. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानला करता आला नाही. 
जगात आपली बेअब्रू होऊ नये म्हणून बालाकोट येथील ‘जैश ए मोहम्मद’च्या प्रशिक्षण तळावर कारवाई झालीच नाही, असे म्हणायची वेळ पाकिस्तानवर आली. कारण भारताने याठिकाणी बॉम्बहल्ले केले आणि त्यात काही अतिरेकी मारल्या गेले, हे मान्य केले असते, तर याठिकाणी अतिरेक्यांचा तळ होता, हे सिद्ध झाले असते, तसेच पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आला असता. त्यामुळे बालाकोट येथील उद्ध्वस्त झालेल्या ‘जैश ए मोहम्मद’च्या तळावर पाकिस्तानी लष्कराने पाकिस्तानी माध्यमांनाही जाऊ दिले नाही. दुसरीकडे भारताने हल्ले केले नाही, याचे पुरावे देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यमांना त्याठिकाणी नेण्याची घोषणा पाकिस्तानने केली, पण त्याला तसे करायचीही हिंमत झाली नाही. म्हणजे आपण पाकिस्तानवर हल्ले केले नाही, हे सिद्ध करण्याची वेळ भारतावर येण्याच्या आधीच भारताने आमच्या हद्दीत हल्ले केले नाही, हे पाकिस्तानला सिद्ध करावे लागत आहे. यालाच काळाने उगवलेला सूड म्हणतात.
 
भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटा पडल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे आता पाकिस्तान युद्धाने काही साध्य होत नाही, चर्चेतून प्रश्न सोडवला पाहिजे, असे म्हणत आहे. पाकिस्तानच्या या तोंडची ही भाषा म्हणजे सैतानाच्या तोंडी गीतेसारखी वाटते. योगायोग म्हणजे ज्या दिवशी भारताने बालाकोट येथील ‘जैश ए मोहम्मद’चा तळ उद्ध्वस्त केला, त्याच्या दुसर्‍या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीत इस्कॉनच्या मंदिरातील 800 किलो वजनाच्या गीतेचे लोकार्पण केले. तसेच महात्मा गांधी यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या गांधी शांती पुरस्काराच्या सोहळ्यातही आपली हजेरी लावली.
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या शत्रुविरुद्ध धनुष्य उचलण्याचा संदेश गीतेतून दिला होता. पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करत मोदींनी गीतेतील याच संदेशाचे पालन केले आहे. त्याचवेळी आपला अहिंसेवरही विश्वास असल्याचे दाखवून दिले आहे. भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान आक्रस्ताळेपणा करत असला तरी भारताविरुद्ध प्रत्यक्ष युद्ध करण्याची पाकिस्तानची क्षमता नाही. आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध झालेली सर्व युद्धे भारताने जिंकली आहेत. त्यामुळे पाकिस्तान भारतविरुद्ध युद्ध छेडू शकत नाही. मात्र आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तो भारतातील घातपाती कारवायात वाढ करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
येत्या दोन महिन्यात भारतात लोकसभा निवडणुका होणार असल्यामुळे भारताला जास्त सावध राहावे लागणार आहे. पाकिस्तानचे कंबरडे मोडत पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनतेच्या आशाआकांक्षांची पूर्तता केली आहे, मोदी खर्‍या अर्थाने जननायक झाले आहे. जोपर्यंत देशाचे नेतृत्व मोदींसारख्या कणखर व्यक्तीच्या हातात आहे, तोपर्यंत कोणी डोळे वटारून तसेच वाकडी मान करून भारताकडे पाहू शकणार नाही, हा संदेश मोदींनी या कारवाईतून दिला आहे.