जबलपूर एक्सप्रेस उद्यापासून पूर्ववत होणार
   दिनांक :28-Feb-2019
अमरावती, 
काही तांत्रिक कारणामुळे १५ फेब्रुवारीपासून ३१ मार्चपर्यंत अमरावती-जबलपूर एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. या निर्णयाचा नियमित प्रवाशांनी जबरदस्त विरोध केल्यामुळे सदर एक्सप्रेस १ मार्चपासून पूर्ववत सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
 
 
 
बडनेरा ते नागपूरपर्यंतच्या रेल्वे मार्गाचे काम सुरु असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नियमित धावणार्‍या ७ रेल्वेगाड्या ३१ मार्चपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात अमरावतीवरुन सुटणार्‍या जबलपूर एक्सप्रेसचाही समावेश होता. सदर एक्सप्रेसने विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार मोठ्या संख्येने नियमित प्रवास करित असल्यामुळे त्यांनी रेल्वेगाडी रद्द करण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला होता. या प्रवाशांनी अमरावती, धामणगाव व वर्धा रेल्वे स्टेशनवर स्टेशन प्रबंधकांना घेराव टाकून जबलपूर एक्सप्रेस पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली होती. वर्धेचे खासदार रामदास तडस, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ व प्रवासी यात्री संघाकडे नियमित प्रवास करणार्‍यांनी निवेदन देऊन जबलपूर एक्सप्रेस तातडीने सुरु करण्याची मागणी केली होती.
 
या मागणीनुसार दोन्ही खासदारांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला. परिणामस्वरुप रेल्वे प्रशासनाने जबलपूर एक्सप्रेस पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २८ फेब्रुवारीला सायंकाळी जबलपूर एक्सप्रेस जबलपूर स्थानकावरुन सुटणार आहे. १ मार्चला सकाळी ती अमरावती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. व त्यानंतर ही गाडी अमरावती स्थानकावरुन सुटेल. या गाडीच्या थांब्यांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात काही बदल करण्यात आले आहे. हे बदल ३१ मार्चपर्यंत राहणार आहे. या बदलानुसार सदर गाडीला तुळजापूर, सेलू रोड, सेवाग्राम, दहेगाव या रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.