नदालचा धक्कादायक पराभव
   दिनांक :28-Feb-2019
ॲकापल्को (मेक्सिको),
जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी असलेल्या स्पेनच्या राफेल नदाल याला मेक्सिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील दुसर्‍याच फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पुरुष एकेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ७२ व्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोस याने नदालचे आव्हान दुसर्‍याच फेरीत संपुष्टात आणले.
 
 
 
बुधवारी रात्री झालेल्या या सामन्यात किर्गियोस याने नदालला ३-६, ७-६, ७-६ असे पराभूत केले. माझ्यासाठी हा एक मोठा व उत्कृष्ट विजय आहे. यात मला फारच संघर्ष करावा लागला. मी कठोर परिश्रमही घेतले, त्यामुळेच मला एवढी चांगली कामगिरी बजावता आली. आज मी ज्या प्रकारे टेनिस खेळलो, ती माझ्यासाठी एक परीक्षा होती. मी सर्व काही दाव्यावर लावले होते. या विजयामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे, त्याचा मला पुढील कामगिरीसाठी फायदा होईल, अशी प्रतिक्रिया नदालविरुद्धच्या विजयानंतर किर्गियोस याने व्यक्त केली.
 
 
 
पुढील फेरीत किर्गियोसचा सामना स्वित्झर्लंडच्या स्टॉन वावरिंकाविरुद्ध होणार आहे. या वावरिंकाने आपल्या दुसर्‍या फेरीच्या सामन्यात स्टीव जॉनसन याचे आव्हान ७-६, ६-४ असे सरळ दोन सेट्‌समध्ये मोडून काढले.