पाककडून पुन्हा शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन
   दिनांक :28-Feb-2019
श्रीनगर,
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारताने केलेल्या कारवाईने बिथरलेल्‍या पाकिस्‍तानच्या कुरापती थांबण्याचे काही नाव घेत नसल्‍याची परिस्‍थिती आहे. आज, गुरुवारी सकाळी पुंछ जिल्ह्यातील कृष्‍णा घाटी सेक्‍टरमध्ये पाकिस्‍तानकडून पुन्हा शस्‍त्र संधीचे उल्‍लंघन करण्यात आले. या आगळीकीला भारतीय जवानांनीही जशास तसे उत्‍तर दिले.

 
आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाकिस्‍तानकडून कृष्‍णा घाटी सेक्‍टरमध्ये मोठ्‍या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. पाकच्या या आगळीकीला भारताने जोरदार फायरींगने उत्‍तर दिले. भारताच्या या आक्रमक प्रत्‍युत्‍तरानंतर सकाळी सात वाजता पाकिस्‍तानने फायरींग थांबवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, शत्रूकडून पुन्हा काही विरोधी हालचाल दिसल्‍यास त्‍याला चोख प्रत्‍युत्‍तर द्‍यावे, असे सांगितले आहे. तसेच अशा कारवाईसाठीची तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांना मोकळीक देण्यात आली आहे.