अमिताभ बच्चनही गाणार रॅप सॉन्ग
   दिनांक :28-Feb-2019
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन लवकरच ‘बदला’ या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, या आगामी चित्रपटात अमिताभ बच्चन हेही रणवीर सिंगसारखे रॅप करताना दिसतील. ‘बदला’च्या मेकर्सनी स्वत: याचा खुलासा केला. ‘औकात’ असे या रॅप गाण्याचे बोल असतील. अमिताभ बच्चन स्वत: हे रॅप गातील. चित्रपटाच्या क्रेडिट लाईनसोबत त्यांचे हे रॅप दाखवले जाईल. या रॅपमध्ये कडक, बोच-या शब्दांसह अमिताभ चित्रपटाचा थ्रीलर पार्ट सांगताना दिसतील.
 
‘बदला’चे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी सांगितले की, आम्ही या चित्रपटासाठी लिहिलेले रॅप अमिताभ यांच्या आवाजासाठी एकदम फिट ठरले. यातील अमिताभ यांचा कूल अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. क्लींटन सेरेजो याने या रॅपला संगीत दिले आहे आणि तोच या रॅप सॉन्गचा कोरिओग्राफर असणार आहे. चित्रपटात अमिताभ हे बादल गुप्ता नामक पात्र साकारताना दिसणार आहेत. बादल गुप्ता ४० वर्षांत एकही केस हरलेला नाही. पण एक केस त्याला आव्हान देते. ही केस तापसी पन्नू लढताना दिसतेय. या चित्रपटाच्या निमित्ताने एक जबरदस्त कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी तापसी व अमिताभ यांच्या ‘पिंक’मधील कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांनी पाहिलाय.