भाकरे महाराज जन्मोत्सव शोभायात्रेत हरिनामाचा गजर
   दिनांक :28-Feb-2019
कारंजा घाडगे,
संत भाकरे महाराज संस्थांनचे वतीने भाकरे महाराज जन्मोत्सवानिमित्य अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी भव्य पालखी शोभायात्रेत कारंजा परिसर हरिनामाच्या गजरात निनादला. भाकरे महाराज सेवाश्रम कारंजा येथे जन्मोत्सवानिमित्य २१ फेब्रुवारी पासून आयोजित सप्ताहात विविध भंजन मंडळांनी भजने सादर केलीत. तसेच शारदादेवी चांडक यांनी भागवत कथा वाचन केले. सुभाष पवार,रामदास गोरे,गुलाब ढोले,हेमंत मस्के यांनी दैनंदिन हरीपाठ व काकडा आरती सादर केली. गुरूवारी भाकरे महारांजांची पालखी शोभायात्रेने कारंजा शहराच्या मुख्य रस्त्याने मार्गक्रमण केले.
 
 
 
शोभायात्रेत कारंजा तालुका व बाहेरील गावच्या दिंडीसह भजन मंडळी सहभागी झाली होती. काटोल येथील पांडूरंग खोडे गुरूजी यांनी भाकरे महारांजाची तसेच भक्ताचे भालदार चोपदारची वेशभुषा करीत शोभायात्रे दरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सनशाईन शाळेचे संस्थापक प्रेम महिले यांचे मार्गदर्शनात वारकरी वेश परीधान करीत चिमुकले विद्यार्थी, विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाले होते.
 
जवळपास पाच ते सहा गावातील पालखीसह महिला पुरूष भंजन मंडळ टाळ मृदूंगाच्या निनादात नाचत गाजत कारंजा शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत होते. डफधारक डफलीवर ताल धरून हरीनामाचा गजर करीत होते. भगवे झेंडे हातात घेऊन, पांढरे शुभ्र वस्त्र परीधान केलेले वारकरी व पिवळसर नारंगी वेशभुषा धारण केलेल्या दिंडी महिला टाळ कुटीत तल्लीन झाल्या होत्या. भाकरे महाराज सेवाश्रम पासून निघालेल्या शोभायात्रेतील सहभागी पालखीधारी भक्तांचे ठिकठिकाणी चरणधुऊन पालखीचे दर्शन नागरिक घेत होते. लक्ष्मण काळे महाराज यांचे काल्याचे किर्तनानंतर भव्य महाप्रसादाचा लाभ उपस्थितांनी घेतला.