वर्ध्यात स्वाइन फ्लूने इसमाचा मृत्यू
   दिनांक :28-Feb-2019
सिंदी(रेल्वे),
वर्ध्यात सध्या स्वाईन फ्लूची साथ असून शहरातील वॉर्ड क्रमांक ३ मधील रहिवाशी सुनील कळमकर यांचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कळमकर यांचा सिंदी परिसरातील खेडे गावात सोप, सुपारी, हळद, मसाला इत्यादी विक्रीचा व्यवसाय आहे. कळमकर यांना १६ फेब्रुवारी रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने ते हिंगणघाट येथे डॉ. प्रकाश लाहुती यांच्याकडे गेले असता त्यांना तपासणी करून औषधी देण्यात आली. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी पुन्हा कळमकर यांना छातीत दाटून येऊन दम येऊ लागला.
 
 
 
डॉक्टरांनी त्यांना तपासून औषधे दिली. परंतु तब्येतीत सुधारणा न झाल्याने त्यांना सेवाग्राम येथील दवाखान्यात भर्ती करण्यात आले. दोन दिवसानंतर तेथील डॉक्टरांनी निमोनिया झाल्याचे सांगितले. त्यांनंतर त्यांना नागपूर येथील 'कल्पवृक्ष' या रुग्णालयात भर्ती करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, खर्च न परवडणारा असल्याने त्यांना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वाजता मेडिकलमध्ये दाखल केले. परंतु दवाखान्यात दाखल केल्याचा दोन तासांतच सुनील कळमकर यांचा मृत्यू झाला.