सुरक्षा परिषदेत अझहरविरोधात प्रस्ताव सादर- भारताच्या प्रयत्नांना यश
   दिनांक :28-Feb-2019
न्यू यॉर्क,
पुलवामा हल्ल्याचा कट रचणार्‍या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याचा काळ्या यादीत समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडण्यात आला. बुधवारी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने हा प्रस्ताव मांडला आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेनेच पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केला, असे या प्रस्तावात म्हटले आहे.
 

 
 
मसूद अझहर याच्यावर शस्त्रबंदीसह आंतरराष्ट्रीय प्रवासबंदीही घालावी, तसेच त्याची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी विनंती अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने 15 सदस्यीय संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंधक समितीला केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंध लावलेल्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर प्रतिबंध लावण्याबाबतच्या प्रस्तावावर फ्रान्स काम करत असल्याचे वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते. संयुक्त राष्ट्रसंघात गेल्या 10 वर्षांमध्ये मसूद अझहरला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी असणारा असा प्रस्ताव चौथ्यांदा सादर करण्यात आला आहे.
 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य असलेल्या चीनच्या अडवणुकीमुळे जैश-ए-मोहम्मद विरोधातील ही मोहीम रखडली आहे. पाकिस्तानधील दहशतवादी संघटनांचा सर्वसामान्यपणे झालेला उल्लेख करणे म्हणजे दहशतवादी संघटनांबाबत कोणता निर्णय जाहीर करणे असा होत नाही, असे चीनने म्हटले आहे. विशेष म्हणजे सुरक्षा परिषदेने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.