दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानने कठोर पाऊल उचलावे- टारो कोनो
   दिनांक :28-Feb-2019
दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कठोर पाऊल उचला अशा शब्दांत जपानने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. काश्मीरमध्ये सध्या परिस्थिती बिघडत असून, त्यासंबंधी चिंता असल्याचेही जपानने म्हटले आहे. जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी यावेळी १४ फेब्रवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्याचा निषेध केला. यावेळी त्यांनी भारत आणि पाकिस्तानने चर्चेतून प्रश्न सोडवून परिस्थिती नियंत्रणात आणावी असे मत व्यक्त केले. 

 ‘काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडत असून आपल्याला चिंता आहे. १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने जबाबदारी घेतलेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. दहशतवादाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानने कठोर पाऊलं उचलणं गरजेचे  आहे’असे जपानचे पराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी म्हटले. 
 
 
 
 
याआधी पुलवामा तणावामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची जपान भेट स्थगित करण्यात आली होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी हे २४ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी अशा चार दिवसांच्या पूर्वनियोजित जपान भेटीवर जाणार होते, मात्र पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधात आलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपली जपान भेट स्थगित केली होती.