भारत-पाकमधील तणाव निवळेल : ट्रम्प
   दिनांक :28-Feb-2019
हनोई,
 भारत-पाकमधील तणाव लवकरच निवळून सैनिकी कारवाया बंद होतील, अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. व्हिएत्नाम येथे उत्तर कोरियाचे शासक किम जॉंग उन यांच्यासोबत आयोजित परिषदेनंतर ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.  


 
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बवर्षाव केला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसली. यानंतर भारताच्या एका िंवग कमांडरलाही पाकिस्तानने ताब्यात घेतले. दोन्ही देशांमधील तणाव वाढत गेला. पण, आता या दोन्ही देशांमधील तणाव निवळत आहे, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे. या दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले, तर त्याचे परिणाम वाईट होतील. जगातील कोणत्याच देशाला या दोघांमध्ये युद्ध व्हावे असे वाटत नाही. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींसोबत आम्ही संपर्कात आहोत. युद्ध होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न फळदायी ठरत आहेत. अमेरिकेच्या मुत्सद्देगिरीमुळे दोन्ही देशांना शांत करण्यात यश आले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. भारतीय उपखंडातून लवकरच गोड बातमी ऐकायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.