पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
कोलकाता :
काही महिन्यांपूर्वीच आंध्र प्रदेश सरकारसह पश्चिम बंगालमध्ये परवानगीशिवाय सीबीआय अधिकाऱ्यांना छापेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. आज कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी शारदा चिटफंड प्रकरणी छापा टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महापौर फिरहाद हकीम उपस्थित होते. 
 
 
गेल्या काही दिवसांपासून भाजपाने पश्चिम बंगालमध्ये सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, राज्य सरकारने पोलिस प्रशासनाला पुढे करून अमित शाह यांचे हेलिकॉप्टर उतरविण्यास मनाई केल्यानंतर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही परवानगी नाकारण्यात आली. शेवटी योगी यांनी फोनवरून भाषण द्यावे लागले.
 
 
सीबीआय ही केंद्र सरकारच्या अखत्यारितील तपास यंत्रणा आहे. दिल्लीत तपास करण्यासाठी किंवा छापे मारण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते. मात्र, अन्य राज्यांमध्ये तपास करण्यासाठी 'सर्वसाधारण सहमती' आवश्यक असते. राज्यांनी काही दशकांपूर्वी ही संमती दिली होती.
 
 
 
मात्र, केंद्र सरकारकडून सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्या अधिकारातील राज्यांमध्ये सीबीआयला दिलेले पत्र मागे घेतले आहे. यामुळे प. बंगालमध्ये कोलकाता पोलिस आयुक्तांच्या घरी छापा मारण्यासाठी गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेण्यात आले.