गडचिरोलीत सामूहिक विवाह सोहळा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
गडचिरोली :
तो आणि ती नक्सल चळवळीत काम करीत असतांना एकमेकांवर त्यांचे प्रेम जडते, सोबत जगण्यासाठी लग्न करण्याचा निर्णय घेतात मात्र, नक्सल चळवळीत लग्न करण्यास मनाई असल्यामुळे सरकारच्या योजनेचा फायदा घेऊन ते आत्मसमर्पण करतात व सरकारच्या व गडचिरोली पोलिसांच्या नवजीवन योजनेचा लाभ घेतात.
 
अश्या नक्सल चळवळीतून बाहेर पडलेल्या ५ आत्मसमर्पित जोडप्यांसोबत ५४ आदिवासी मूलां-मुलींचा सामूहिक विवाह सोहळा पोलीस विभाग गडचिरोली, मैत्री परिवार संस्था नागपूर, साईभक्त साई सेवक परिवार नागपूर यांच्या सहयोगाने आज आलापल्ली येथील क्रीडा संकुल मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला.
 
 
 
यावेळी आदिवासी परंपरेने पार पडलेल्या या सोहळ्याला पालकमंत्री अंबरीश राव आत्राम, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेष  बलकवडे, सीआरपीफ कॉम्मनडेंट राकेश श्रीवास्तव, श्रीराम मीना, अति. पोलीस अधीक्षक अजय बन्सल, मोहित गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग देसाई, जी.प. उपाध्यक्ष अजय कांकडाळवार, मैत्री संस्थेचे प्रमोद पेंडके, गंगाराम साखरकर, निरंजन वासेकर, दत्ता शिर्के, डॉ. शिवनाथ कुंभारे, जैस्वाल, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे आदी. ची उपस्तिथी होती.
 
यावेळी पालकमंत्री म्हणाले , गडचिरोली जिल्हा हा दुर्गम आहे जिल्ह्याची नक्सलग्रस्त ओळख पुसून विकसनशील ओळख निर्माण करण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे. तळागाळातील गरजू लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व हिंसामुक्त समाज निर्माण करण्यासाठी अश्या सामूहिक विवाह सोहळ्याची गरज आहे.
 


 
पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले , वाट भरकटत गेलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सरकारच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्हातील चांगल्या गोष्टी हस्तकला, लोककला सोबत येथील तरुणांच्या अंगी असलेल्या क्रीडा विषयक कौशल्य राज्य देश पातळीवर जावे यासाठी पोलीस विभाग प्रयत्न करीत आहेत.
 
यावेळी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांचा मैत्री संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच, नव-विवाहित जोडप्यांना  जीवनोपयोगी भेटवस्तूचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.माधुरी यावलकर यांनी केले.