भारताने सामन्यासह मालिका जिंकली
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
- अंबाती रायुडू सामनावीर, तर  मोहम्मद शमी मालिकावीर
 
वेलिंग्टन : 
अखेरच्या वन-डे सामन्यात निशाराजनक सुरुवात केल्यानंतर भारताने चिवट झुंज देत न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय नोंदवत वन-डे मालिका ४-१ ने खिशात घातली. याविजयासह तब्बल १० वर्षांनी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
 
भारताने यजमान संघासमोर विजयासाठी २५३ धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु न्यूझीलंडचा संघ ४४.१ षटकात २१७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.
 

 
 
भारताप्रमाणे न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मोहम्मद शमीने दोन्ही सलामी फलंदाजांना नियमित अंतराने पॅव्हेलियनमध्ये परत पाठविले. यानंतर कर्णधार केन विल्यम्सन व टॉम लाथम यांनी अर्धशतकी भागीदारी केल्याने सामन्यात चुरस निर्माण झाली होती, परंतु अशातच लाथम बाद झाला. त्यानंतर इतर फलंदाज एकापाठोपाठ पॅव्हेलियनमध्ये परतले. जिमी निशमने झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, मोहम्मद शमी व हार्दिक पांड्याने प्रत्येकी २-२ तर भुवनेश्वर कुमार व केदार जाधवने प्रत्येकी १ बळी घेतला.
 
 
 
तत्पूर्वी, अंबाती रायुडू, विजय शंकर, केदार जाधव व हार्दिक पांड्या या फलंदाजांनी मधल्या फळीत केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात २५२ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलानंतर, भारताची सुरुवात खराब झाली. पहिल्या फळीतील चार महत्वाचे फलंदाज अवघ्या १८ धावातच बाद झालेत.
 
 
 
अंबाती रायुडूने विजय शंकरच्या साथीने भारताचा डाव सावरला. या दोघांनी संयमाने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा सामना करत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी केली. चोरटी धाव घेण्याच्या नादात विजय शंकर धावबाद झाल्यानंतर रायुडूने केदार जाधवच्या साथीने संघाची धावसंख्या वाढविली. रायुडूने ८ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ९० धावांची दमदार खेळी साकारली. यानंतर हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांत  फटकेबाजी करत भारताला २५० धावांचा टप्पा गाठून दिला. पांड्याने २२ चेंडूत ४५ धावा फाटकावल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेनरीने ४, ट्रेंट बोल्टने ३, तर जिमी निशमने १ बळी टिपला.