अमरावती :
पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान व्हावे यासाठी 'कहो दिलसे मोदीजी फिरसे' हा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राजलक्ष्मी नंदा यांच्या नेतृत्वात बुलेटवर भारत भ्रमणासाठी निघालेली शक्ती यात्रा आज अमरावतीत पोहोचली. यात्रेचे शहरात त जंगी स्वागत करण्यात आले.
शक्ती यात्रेत राजलक्ष्मी नंदा यांच्यासोबत २५ युवकांची चमू असून, ही यात्रा १५ जानेवारीला बंगळुरू येथून निघाली. ८ राज्यातून ५५ दिवसात १५५ जिल्ह्यातून जवळपास १५ हजार किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा दिल्लीत पोहचणार आहे. या यात्रेचे सर्व प्रथम स्वागत मांगीलाल प्लॉट येथील डागा सफायर कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले. यावेळी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार सुनील देशमुख, भाजपा नेते किरण पातूरकर, शहर सुधार समिती सभापती श्रीचंद तेजवणी, विवेक चुटके, डागा सफायरचे संचालक राजेश डागा, कमलेश डागा, आदित्य डागा, केशव डागा, प्रीती डागा, नीता डागा व अन्य मंडळींनी केले.
गेल्या पावणे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व समाज घटकांसाठीे उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यामुळे देश विश्वगुरु बनण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागला आहे. विश्वगुरु होण्याचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. मी व माझे सहकारी भाजपा व अन्य कोणत्या पक्षाशी जुळलेलो नाही. तरी सुद्धा आम्ही स्वप्रेरनेने 'कहो दिलसे मोदीजी फिरसे' हा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी ही यात्रा काढली असल्याचे राजलक्ष्मी नंदा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.