पाकी लष्करातील दोन अधिकार्‍यांविरुद्ध अटक वॉरंट
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
मुंबई, 
 
 
मुंबईवरील 26/11 रोजीच्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने पाकिस्तानच्या लष्करातील दोन वरिष्ठ अधिकार्‍यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे.
 
 
मेजर अब्दुल रेहमान पाशा आणि मेजर इक्बाल अशी या लष्करी अधिकार्‍यांची नावे आहेत. मेजर पाशा हे सेवानिवृत्त झाले आहेत, तर मेजर इक्बाल अजूनही आयएसआय गुप्तचर संस्थेचे अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मुंबई हल्ल्यात माफीचा साक्षीदार बनसलेला लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आणि या हल्ल्यातील कटाचा सूत्रधार डेव्हीड हेडली यानेच या दोघांची माहिती दिली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही या दोन्ही लष्करी अधिकार्‍यांचा समावेश आहे.
 
 
विशेष सरकारी वकील उज्ज्व निकम यांनी, या दोनी पाकिस्तानी अधिकार्‍यांविरुद्ध आजमीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. व्ही. यारलागड्‌डा यांनी तो अर्ज मान्य करीत अटक वॉरंट जारी केला. डेव्हीड हेडलीच्या चौकशीतून, मेजर पाशा आणि मेजर इक्बाल हे दोघेही मुंबई कटाच्या बैठकीत सामील असल्याचे सिद्ध झाले असल्याने, त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात यावा, असा जोरदार युक्तिवाद निकम यांनी केला होता.