शेफारलेले कारटे...
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
साडेसहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नेमका दिवस सांगायचा तर 27 ऑगस्ट 2013 ची रात्र होती. लोकसभेत अन्नसुरक्षा कायद्याची चर्चा लांबलेली होती. तिथे आपल्या भाषणातून, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी, या कायद्याला सर्वांनी पािंठबा द्यावा म्हणून आग्रही आवाहन केलेले होते. नरम प्रकृती असलेल्या सोनियांना त्या लांबलेल्या बैठकीचा इतका शिणवटा आलेला होता, की अकस्मात त्यांची तब्येत सभागृहातच खालावली. धावपळ करून त्यांना एम्स या मोठ्या इस्पितळात उपचारासाठी तत्काळ हलवावे लागलेले होते. इतक्या गंभीर अवस्थेतही त्यांना चालत संसदभवनातून बाहेर यावे लागले आणि कुठलीही वैद्यकीय व्यवस्था त्या परिसरात सज्ज नव्हती. सगळ्यांचीच तारांबळ उडाली. या विषयात प्रतिक्रिया देताना गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींनी तेव्हा सोनियांना लवकरच आराम पडण्याची इच्छा व्यक्त केली आणि संसदभवनातील अपुर्‍या वैद्यकीय सज्जतेवर बोट ठेवलेले होते. आज इतक्या वर्षांनी त्याचे स्मरण इतक्यासाठी झाले, की कुणाही मित्रशत्रूच्या आजाराविषयी किती संवेदनशील असावे, त्याचा तो दाखला आहे आणि त्याच सोनियांच्या सुपुत्राला त्याचे िंकचितही भान नसल्याचा प्रकार समोर आला आहे. गेले वर्षभर तरी मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री मृत्यूशी झुंज देत आपले काम करीत आहेत. वैद्यकीय साहाय्य घेऊनच त्यांना एक एक दिवस कंठावा लागतो आहे. अशा वेळी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला गेलेल्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नंतर व्यक्त केलेली प्रतिक्रिया, नुसती संतापजनकच नाही तर अत्यंत अमानुष आहे. पण, त्यासाठी त्यांना दोष देता येणार नाही. शेफारलेल्या पोराचा कधीच दोष नसतो. त्याच्या खुळचट वेडाचाराचे कौतुक करणारे जाणते व वडीलधारेच खरे गुन्हेगार असतात. पर्रीकरांच्या भेटीनंतरची राहुलची मुक्ताफळे म्हणूनच भारतीय माध्यमांच्या दिवाळखोरीचा दाखला आहे.
 
 
 
 
 
गेले कित्येक महिने पर्रीकर असाध्य आजाराचे शिकार होऊन, साक्षात मृत्यूशी झुंजत आहेत आणि ती बाब जगाला माहिती आहे. अनेकदा इस्पितळात राहून आणि कधी वैद्यकीय सुविधा वापरून पर्रीकर राजकीय कर्तव्य पार पाडत आहेत. अवघा गोवा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत असतो. गोव्यात गेलेले कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सदिच्छा म्हणून पर्रीकरांना भेटायला गेले. आधी कुठलीही भेट ठरलेली नसताना पर्रीकरांनी राहुलला परवानगी दिली. अवघी पाच मिनिटे ती भेट झाल्यानंतर, तिचा राजकीय हेतू साधण्यासाठी गैरवापर करणे लज्जास्पदच नाही, तर अमानुष आहे. कारण त्या भेटीनंतर राहुलने जे निवेदन केले, ते पर्रीकरांना अधिक कष्टप्रद व त्रासदायक ठरलेले आहे. कुठल्याही आजारी माणसाला भेटायला जाण्यातल्या सदिच्छा त्याला आराम मिळावा िंकवा मानसिक शांतता मिळावी, यासाठी असतात. पण, राहुल गांधी यांनी पर्रीकरांना, तोंडी बोलताना सदिच्छा दिल्या आणि बाहेर पडल्यावर असे काही कृत्य केले, की आपल्या प्रकृतीला पडणारा ताण बाजूला ठेवून पर्रीकर यांना प्रदीर्घ खुलासा करण्याचे कष्ट घ्यावे लागले. राहुल गांधी धडधडीत खोटे बोलत आहेत आणि त्यांच्याशी झालेल्या पाच मिनिटांच्या भेटीत राफायलविषयी कुठलीही चर्चा झालेली नव्हती, असे पत्र लिहून पर्रीकरांना याही अवस्थेत स्पष्ट करावे लागले. राहुलच्या कृतीला बेशरमपणाची परमावधी म्हणावे लागेल. कारण असा खुलासा करणारे पर्रीकर हे पहिलेच व्यक्ती वा राजकीय नेते नाहीत. यापूर्वी फ्रान्सचे आजी-माजी राष्ट्राध्यक्षही राहुलच्या अशाच खोटेपणाविषयी खुलासे करून मोकळे झालेले आहेत. िंकबहुना राहुलशी कोणी भेटणे, बोलणे आता घातक झालेले आहे. बाहेर जाऊन हा इसम वाटेल ते आरोप वा गवगवा करू शकतो, इतकाच त्याचा अर्थ झाला आहे. पण, त्याचे खापर माध्यमातील दिवाळखोरांवर फोडावे लागेल. कारण त्यांच्या प्रसिद्धीमुळे राहुल नावाचे हे पन्नाशीतले पोर कमालीचे शेफारलेले आहे.
 
 
 
 
आपल्या आसपास वा घरातच एखादे लाडावलेले पोर असते आणि कायम उचापती करीत असते; त्यापेक्षा पन्नाशी गाठलेल्या राहुल गांधींची आजकालची स्थिती िंकचितही वेगळी नाही. मनात येईल ते बरळावे िंकवा कुठलीही सभ्यता झुगारून मनमानी करावी, हा त्यांचा स्वभाव बनून गेला आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास प्रस्तावाच्या वेळी त्यांनी लोकसभेत भाषण झाल्यावर उठून जबरदस्तीने पंतप्रधानांशी गळाभेट करण्याचे नाटक केलेले होते. तेव्हा सभापती सुमित्रा महाजन यांच्यावर, या कॉंग्रेस अध्यक्षाला समज देण्याची वेळ आलेली होती. एका शतायुषी पक्षाचा अध्यक्ष वा नेहरू खानदानातील कुणाही सदस्याला सभापतींचे असे खडेबोल यापूर्वी कधी ऐकायची नामुष्की आलेली नव्हती. इथेच हा पोरकटपणा संपत नाही. ती गळाभेट उरकल्यावर आपल्या जागी परतलेल्या राहुलनी, खोडकर मुलाने आपल्या सवंगड्यांना डोळा मारून इशारे करावेत, तसाही बालिशपणा केला होता आणि तो कॅमेराने टिपलेला होता. हा विषय देशातल्या जुन्या राजघराण्यातील लाडावलेल्या मुलाच्या कौतुकाचा नव्हता; तर लोकसभा व संसदीय सभ्यतेचा मामला आहे. याचेही भान माध्यमातील अतिशहाण्यांना राहिले नाही. कोणी पुढाकार घेऊन राहुलचे कान उपटले नाहीत, की संपादकीय टिपणी करून कॉंग्रेस पक्षाला त्याचा जाबही विचारला नाही. असे झाल्यावर हे पन्नाशीतले अल्लड बालक अधिकच शेफारत गेल्यास आश्चर्य कुठले ना? घरातले लाडावलेले पोर कौतुकाचे असते आणि त्याच्या उचापतींचा कितीही त्रास होत असला, तरी गुणगानच होत असते. पण, त्याही घरात जेव्हा उचापतींचा अतिरेक होतो, तेव्हा पाठीत धपाटे घातले जातात. सार्वजनिक जीवनात माध्यमातील पत्रकार-संपादकांची तीच जबाबदारी असते. ती किती पाळली जाते? नसेल तर त्या शेफारलेल्या पोराला आपल्या उचापती म्हणजे कर्तृत्व वाटू लागल्यास नवल नाही. राहुल गांधींची तीच अवस्था झालेली आहे.
 
 
 
 
मागील वर्षभरात या शेफारलेल्या कॉंग्रेस अध्यक्षाने त्या शतायुषी राजकीय पक्षाची सगळी प्रतिष्ठा व अब्रू धुळीस मिळवली आहे. पण, मोदीद्वेषाने भारावलेल्या काही संपादक विश्लेषकांना आपली जबाबदारी पार पाडता आलेली नाही. बेछूट खोटे बोलणे वा बिनबुडाचे आरोप करण्याला आक्रमक राजकारणाची बिरुदावली लावून, राहुलच्या बालिश उचापतींचे उदात्तीकरण झाले आहे. परिणामी, हे पन्नाशीतले उचापतखोर कारटे, अधिकाधिक वाह्यातपणा करू लागलेले आहे. अर्थात, अशा उचापती घरी होतात तिथपर्यंत सर्वकाही ठीक असते. पण, जेव्हा त्याचे सार्वजनिक प्रताप लोकांच्या वाट्याला येतात, तेव्हा समाजाला त्याचा बंदोबस्त करावा लागत असतो. लौकरच लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे, तेव्हा भारतीय मतदाराला अशा बुद्धिमंतांचा व माध्यमांच्या लाडक्याला धडा शिकवणे म्हणूनच भाग ठरणार आहे. पर्रीकरांच्या बाबतीत या कारट्याने केलेला प्रकार अमानुष व सर्व सभ्यता गुंडाळून ठेवणारा आहे. पण, भाजपाच्या कुणा नगण्य खासदाराच्या वक्तव्यावरून गदारोळ करणार्‍यांना पर्रीकर प्रकरणी राहुलचा कान धरावा वाटलेले नाही. पर्यायाने ती जबाबदारी जनतेलाच उचलावी लागणार आहे. मात्र तो एकट्या राहुलचा पराभव नसेल, तर एकूणच भारतीय माध्यमे आणि पुरोगामी विचारवंत जाणकारांना मतदाराने फटकारलेले असेल. रुग्णाला भेटून येणार्‍याने अशा रीतीने त्याला मनस्ताप देणे िंकवा त्याच्या नावाने खोटी विधाने करण्याला आक्रमक राजकारण मानायचे असेल, तर विचारांच्या दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण झाली म्हणायची. विविध वाहिन्यांवर बुद्धिमंत म्हणून हजेरी लावणार्‍यांनी केलेला राहुलचा बचाव केविलवाणाच नाही, तर त्यांच्या पागलपणाचा नमुना आहे. ज्यांनी बचाव केला नसेल, पण कान उपटण्याचे कर्तव्य पार पाडले नाही, त्यांचीही यातून सुटका नाही. कारण त्यांनीच हे कारटे शेफारून ठेवलेले आहे...