वातानुकुलित खोलीत बसणार्‍यांना सहा हजाराचे मोल कळणार नाही;पंतप्रधानांचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
लेह, 
 
 
माझ्या सरकारने देशभरातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली, पण कॉंगे‘स व अन्य विरोधकांनी त्यावरही टीका केली. दिल्लीत वातानुकुलित खोलीत बसणार्‍यांना गरीब शेतकर्‍यांसाठी सहा हजार रुपये किती मोलाचे आहेत, याचे महत्त्व कधीच कळणार नाही, असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे चढविला.
 
 
लेह येथे विविध विकासात्मक योजनांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केल्यानंतर आयोजित विशाल जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते. लेह आणि लडाख प्रांतातील बहुतांश शेतकरी सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. ही सहा हजाराची रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाईल. याच महिन्याच्या अखेरीस दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे येत्या दोन दिवसांतच राज्यांना प्राप्त होणार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
 
 
 
भाजपाचा सामान्य कार्यकर्ता असताना मी सातत्याने लेहमधून दिल्लीकरिता भाजीपाला आणण्याचा आग्रह धरत असे. येथील भाजीपाल्याचा दर्जा अतिशय उत्तम आहे, अशी आठवण त्यांनी करून दिली.
 
भूमीपूजन केले, उद्‌घाटनही मीच करणार
 
लेहमधील नवीन विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. आज मी या इमारतीचे भूमिपूजन केले आहे, तुमचा आशीर्वाद मिळाला तर उद्‌घाटन देखील मी करणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. यानंतर त्यांनी विजयपूर आणि अवंतीपुरा येथील नवीन एम्स रुग्णालयाची पायाभरणी केली.
लडाखला मिळाले पहिले विद्यापीठ
 
 
 
 
पंतप्रधान मोदी यांनी लडाखच्या लेह येथे पहिल्या महाविद्यालयाचीही पायाभरणी केली. या विद्यापीठाच्या अखत्यारीत येणारी महाविद्यालये लेह, कारगिल, नुब‘ा, झंस्कार, द्रास, खालस्ती या ठिकाणी उघण्यात येतील, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. यानंतर लडाखसाठी नव्या पर्यटन मार्गाचे उद्‌घाटनही त्यांनी केले.