ब्रिटनच्या राणी एलिझाबेथसह शाही घराण्याला गुप्त ठिकाणी स्थलांतरित करणार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :03-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
लंडन;
 
 
 येत्या महिन्यात ब्रिटनच्या युरोपियन संघातून एक्झिट अर्थात ब्रेक्झिटचा अंतिम निर्णय समोर येणार आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या जनमत चाचणीत नागरिकांनी ब्रिटनला बाहेर पडण्यासाठी होकार दिला होता. परंतु, राजकीय डावपेचांमुळे त्याला मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अशात देशात मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने आणि दंगली घडू शकतात. यामुळे ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वीतीय आणि त्यांच्या शाही कुटुंबाला इतर ठिकाणी हलवण्याची तयारी केली जात आहे.
 
 
 
ब्रिटनच्या सरकारी सुत्रांचा दाखला देत द संडे टाइम्स दैनिकाने असे वृत्त दिले आहे. शीतयुद्धाच्या काळात आणि सोव्हिएत संघाकडून अण्वस्त्र हल्ल्याचा धोका असल्याच्या परिस्थितीत शाही कुटुंबाला इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची योजना होती. गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटनचे युरोपियन संघ सोडण्यावरून वाद सुरू आहेत. राजकीय गुंतागुंत आणि जनाक्रोष पाहता दंगलीची शक्यता नकारता येत नाही. अशा परिस्थितीत क्वीन एलिझाबेथ यांच्यासह शाही घराण्याला एका गुप्त ठिकाणी स्थलांतरित करण्याची योजना आखली जात आहे. युनायटेड किंगडमने युरोपियन संघ सोडण्याची अंतिम मुदत 29 मार्च आहे. अशात युनायटेड किंगडम (ब्रिटन) आणि युरोपियन संघ दोघेही वेगळे होण्यास तयार आहेत. परंतु, फारकत होताना डील कशा स्वरुपाची करावी आणि उद्योगांचे काय यावर एकमत होत नाही. सोबतच, ब्रिटनच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांसह सत्ताधारी पक्षाचे खासदार सुद्धा पंतप्रधान थेरेसा मे यांच्या प्रस्तावांच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे, ही डील होणार नाही अशी दाट शक्यता आहे.