ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याच्या कार्यक्रमात बदल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 - टी-20 सामन्यांच्या ठिकाणात बदल
मुंबई:
ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पाच एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. मात्र, या दौऱ्याच्या कार्यक्रमात सुरक्षेच्या कारणास्तव थोडे बदल करण्यात आले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरूवातीला टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार पहिला सामना २४ फेब्रुवारीला बंगळुरु येथे खेळवण्यात येणार होता, परंतु सुरक्षेचा कारणास्तव हा सामना आता विशाखापट्टणम येथे होणार आहे, तर विशाखापट्टणम येथे होणारा दुसरा सामना बंगळुरुला होणार आहे.
 
 
२४ फेब्रुवारीला होणाऱ्या इंटरनॅशनल एअरो इंडिया शो मुळे येथे क्रिकेट सामना खेळवणे अवघड आहे. तसेच खेळाडूंच्या राहण्याच्या सोयीसह, सुरक्षेच्या समस्याही उद्भवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आम्ही बीसीसीआयला ट्‌वेंटी-२० सामना इतरत्र हलवण्याची विनंती केली होती, असे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेकडून सांगणम्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका २ मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( ५ मार्च), रांची ( ८ मार्च), मोहाली ( १० मार्च ) व दिल्ली ( १३ मार्च ) असे सामने होतील.