ममतांचे ‘बुरे दिन’ सुरू...!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी पश्चिम बंगालमधील ठाकूरनगर येथे प्रचंड मोठी सभा झाली. सभेला जनतेने एवढी गर्दी केली की, मैदान कमी पडले आणि तेथे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. हे पाहून स्वत: मोदींनाच आपले भाषण १४ मिनिटांत आटोपते घ्यावे लागले. कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर सभा घेऊन दाखवावे, असे आव्हान ममतांनी भाजपाला दिले होते. एवढी मोठी संख्या पाहून आता ब्रिगेड ग्राऊंडवर आगामी सभा घेण्याचा भाजपाचा विचार आहे. मोदींची, दुर्गापूर येथेही सभा झाली. तेथेही हजारो लोक जमले होते. एवढे मात्र नक्की की, केवळ ठाकूरनगरच्याच सभेने ममतांची बोबडी वळलेली दिसते. ममतांचा धिंगाणा नेहमीप्रमाणे यावेळीही दिसला. आदल्या दिवशी मोदींच्या पोस्टरवर ममतांचे पोस्टर चिटकविण्यात आले. भाजपाचे पोस्टर्स तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी शाई, रंग फेकून ते विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. पोलिसांनी सभास्थानी असलेल्या खुर्च्या फेकून दिल्या. गोंधळामुळे काही लोक जखमीही झाले. पण, हे मान्यच करावे लागेल की, विरोधकांच्याही तोंडचे पाणी पळावे अशी ती प्रचंड मोठी सभा झाली.
 
काही दिवसांपूर्वी ममतांनी आपल्या व्यासपीठावर विरोधी नेते व अडगळीत पडलेल्या काही नेत्यांना बोलावून शक्तिप्रदर्शन केले होते. ममतांना पंतप्रधान व्हायची स्वप्ने पडू लागली आहेत. भाजपाने मात्र त्यांच्या या स्वप्नांचा चुराडा करण्याचा चंग बांधला आहे. ठाकूरनगरच्या सभेने तो उजागर झाला. यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याही सभांना दणदणीत उपस्थिती होती. हा संकेत ममतांसाठी आणि विरोधकांनाही योग्य संदेश देणारा आहे, हे वेगळे सांगायला नको. ममतांनी यापूर्वी भाजपाच्या सभा होऊ नयेत म्हणून वाट्‌टेल ते प्रयत्न केले. हिंदू  देवी-देवतांचा अपमान केला. बंगालमधील सर्वात मोठा सण समजल्या जाणार्‍या दुर्गोत्सवाची तमा न बाळगता, दुर्गाविसर्जनाच्या दिवशी मोहर्रम येत असल्यामुळे, दुर्गाविसर्जनाची मिरवणूक रोखून धरली. केवळ मुस्लिम आणि घुसखोरांचे लांगूलचालन करण्याच्या सार्‍या मर्यादा ममतांनी पार केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे बंगालचे मानस खवळले. तेथे सरळसरळ हिंदू विरुद्ध मुस्लिम असे ध्रुवीकरण तयार झाले. याला सर्वस्वी ममताच जबाबदार आहेत. ज्या ज्या वेळी हिंदू मानसावर आघात झाला,  हिंदू चवताळून उठला, हा इतिहास आहे. ममतांना त्याचे कदाचित भान नसावे. त्यांना अजूनही असे वाटत असेल की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखा आपण लोकसभा निवडणुकीतही नंगानाच करू, तर त्या मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत, असेच म्हणावे लागेल.
 
 
 
ममतांची ही काळी कृत्ये बरीच आधी उघड झाल्याने आता निवडणूक आयोगालाही गंभीरपणे दखल घ्यावी लागणार आहे. बंगालमधील पोलिस दले ही पूर्णपणे ममतांच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत आयोग कसा बंदोबस्त करते, हे पाहावे लागेल. ममतांच्या लांगूलचालनाची हद्द त्या वेळी पार झाली, जेव्हा रोिंहग्या मुसलमानांना त्यांनी छुप्या मार्गाने प. बंगालमध्ये आणले. त्यांना रेशन कार्ड दिले, त्यांना आधार कार्ड, मतपत्रिका बनवून दिल्या. बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांनाही ममतांनी पूर्ण संरक्षण दिले. मुसलमानांच्या मतांच्या आधारे आपण निवडणूक जिंकू, असे ममतांना वाटत आहे. पण, ते आता तेवढे सोपे नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथिंसह यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील फालपाटा येथे सभा घेतली. प. बंगाल आणि बांगलादेशची सीमा सील करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने जागा मागितली होती. ती देण्यास ममतांनी नकार दिल्याने, आता अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ही सीमा सील केली जाणार आहे.
 
ममतांच्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत शंभरावर भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी सोडले नाही. बंगालमध्ये विरोधक नको, त्यांच्या सभा नकोत, यासाठी ममतांनी लोकशाहीचा खून पाडला आहे. त्यांचा संविधानावर विश्वास नाही. न्यायालयांवर विश्वास नाही. ममतांच्या व्यासपीठावर जमलेल्या एकालाही बंगालमधील हा नंगा नाच दिसत नाही. मां, माटी, मानुष म्हणून त्या कम्युनिस्टांना नमवून सत्तेवर आल्या. पण, सत्ता हाती येताच त्या आपली सर्व तत्त्वे विसरल्या. ममतांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे की, भाजपाचा कार्यकर्ता हा चिवट झुंज देणारा आहे. प्रसंगी तो आपले प्राण देईल, पण भाजपाचा झेंडा सोडणार नाही. भाजपाचा कार्यकर्ता म्हणजे कॉंग्रेस अथवा कम्युनिस्ट पक्षासारखा नाही. त्याची घडणच तशी आहे. त्याचाच तर हा परिणाम आहे की, आज पश्चिम बंगालसारख्या राज्यात ममतासारख्या क्रूर सम्राज्ञीला भाजपा आव्हान देत आहे. कर्नाटकानंतर प. बंगालमध्ये सर्व विरोधक एकत्र आले खरे, पण मोदींनी त्यांच्याच राज्याला लक्ष्य करण्याचे ठरविल्यामुळे, प्रत्येक प्रादेशिक पक्षाला आपापले अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दक्षिणेतही केरळ, तामिळनाडू, आंध्र या राज्यांत मोदींच्या सभेला होत असलेली गर्दी त्याचे निदर्शक आहे.
 
उत्तरप्रदेशात कमी होणारी संभाव्य जागांची स्थिती पश्चिम बंगाल, ओडिशा, केरळ आणि तामिळनाडूतून भरून काढण्याचा भाजपाने चंग बांधला आहे. त्यासाठी भाजपाने पूर्ण ताकदीने कंबर कसली आहे. सध्याच्या सभा तर एक झलक आहेत. मोदींनी देशभरात शंभर सभा घेण्याचा संकल्प केला आहे. विरोधक, कम्युनिस्टधार्जिणे पत्रपंडित आणि शिवसेना म्हणते, मोदींचा आता २०१४ सारखा करिश्मा राहिलेला नाही. शिवसेनेला ब्लॅकमेिंलग करण्याच्या उद्योगात फारच रस दिसतो. पण, अजूनही वेळ गेलेली नाही. ती गेली तर मग केवळ हात चोळत बसण्याची पाळी येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे! मोदी, अमित शाह यांच्या बंगाल, आंध्र, तामिळनाडू, केरळमधील दणदणीत सभांनंतर आता कुणी गठबंधनाचे नावसुद्धा घेत नाही. कारण, त्यांना भीती वाटत आहे की, अंदाजपत्रक घोषित झाल्यानंतर पुन्हा २०१४ सारखी मोदीलाट येऊ शकते. कॉंग्रेसची स्थिती तर सर्वाधिक दयनीय झाली आहे. कुणीही त्यांच्यासोबत युती करण्यास तयार नाही, अगदी ममता बॅनर्जीसुद्धा नाही! त्यामुळे पंतप्रधानपदी डोळा असलेल्या राहुलला केवळ पाच राज्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. तेथेही भाजपासोबत लढत सोपी नाही.
 
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर चित्र झपाट्याने बदलत आहे. भाजपा पूर्णपणे सावरली असून, विरोधकांवर मात करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना जागे करण्याचे काम करीत आहे. ममता जेवढा त्रास भाजपाला देत आहे, तेवढ्याच ताकदीने भाजपा उसळी घेत आहे. भाजपाने बंगालमध्ये २२ जागांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. पण, ममतांच्या या अघोरी वृत्तीमुळे या जागा वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मोदी आपल्या भाषणात म्हणालेही, ‘‘मला आता कळले की, ममता एवढ्या हिंसक का झाल्या.’’ जी खेळी कम्युनिस्टांनी खेळली होती, त्यापेक्षा दुप्पट नीचपणा ममता दाखवीत आहेत. त्यांचा हा गर्व उतरण्यासाठी फार दिवस कारण, बंगालची जनता आता पुरेशी जागृत झाली आहे...लागणार नाहीत. आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेत त्यांना कधी नव्हे एवढे पराभवाला तोंड पाहावे लागणार आहे.