ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाने निधन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
मुंबई :
आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे आज मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
रमेश भाटकर यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी न्या. मृदुला भाटकर, मुलगा हर्षवर्धन, सून असा परिवार आहे. रमेश भाटकर यांच्या पार्थिवावर आज रात्री १० वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
 
रमेश भाटकर यांनी आपल्या अभिनयाने तीन दशके मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर आपला दबदबा राखला. टीव्ही मालिकांमधील त्यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका लोकांच्या विशेष पसंतीस उतरल्या. 'हॅलो इन्स्पेक्टर', 'दामिनी' या त्यांनी अभिनय केलेल्या मालिका गाजल्या. रमेश भाटकर यांच्या माहेरची साडी या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले.
रमेश भाटकर हे प्रसिद्ध भजनसम्राट-संगीतकार स्नेहल (वासुदेव) भाटकर यांचे सुपुत्र. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ ला झाला. रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरूनच झाली. 'अश्रूंची झाली फुले' हे त्यांचे नाटक विशेष गाजले. 'केव्हातरी पहाटे', 'अखेर तू येशीलच', 'राहू केतू', 'मुक्ता' ही त्यांची काही गाजलेली नाटके. १९७७ ला 'चांदोबा चांदोबा भागलास का' या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी 'अष्टविनायक', 'दुनिया करी सलाम', 'आपली माणसं' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
गेल्याच वर्षी ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. वयाची सत्तरी गाठली तरी भाटकर यांचा कामाचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. खऱ्या अर्थाने ते चिरतरुण होते. काही महिन्यांपूर्वीच 'तू तिथे मी' आणि 'माझे पती सौभाग्यवती' या मालिकांमधून त्यांनी अभिनय केला होता.