शेतकऱ्यांच्या अनुदानात होऊ शकते वाढ; अरुण जेटली यांचे संकेत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
छोटय़ा शेतकऱ्यांना वर्षांला सहा हजार रुपये थेट अनुदान देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली असून या अनुदान रकमेत वाढ होऊ शकते, असे संकेत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. तसेच राज्यांनी शक्य असेल या रकमेत भर घालावी अशी सूचना जेटली यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत केली.
छोटय़ा शेतकऱ्यांना सरकारी योजनांच्या लाभाबरोबरच वर्षांला ही रक्कम मिळणार आहे. त्यांना स्वस्तात घर, धान्य तसेच आरोग्य सुविधा याबाबतच्या योजनेंचेही लाभ मिळत आहे. १५ कोटी भूमिहीन या योजनेतून वगळले असले तरी मनरेगासारख्या योजनांचा त्यांना लाभ मिळत असल्याचे जेटली यांनी निदर्शनास आणून दिले. काँग्रसने शेतकऱ्यांसाठी कोणती मोठी योजना आणली, असा सवाल जेटली यांनी केला. तत्कालीन अर्थमंत्री चिदम्बरम यांनी ७० हजार कोटींची कृषीकर्जमाफी जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र ५२ हजार कोटी माफ झाल्याचे जेटली यांनी निदर्शनास आणून दिले.
‘गरिबी हटाव’सारख्या योजनेतून फार काही साध्य झाले नाही, असे जेटली यांनी सांगितले. ग्रामीण भागात पायाभूत सुविधा वाढविणे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर या सरकारने भर दिल्याचे जेटली यांनी सांगितले. अमेरिकेत उपचार पूर्ण झाले असले तरी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी भारतात येणार नसल्याचे संकेत अरुण जेटली यांनी दिले आहेत. यामुळे संसदेत चर्चेला पीयूष गोयल हेच उत्तर देतील.