पद्मावती जिनिंगला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
वर्धा :
जाम रोडवरील आजंती येथील पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीजच्या जिनिंगला दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली़. आग एवढी भीषण होती की, ३ फलाटांवर ठेवण्यात आलेला साडेआठ हजार क्विंटल कापूस काही क्षणातच भस्मसात झाला यामध्ये कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे़
३१ जानेवारीपासून खरेदी करण्यात आलेला कापूस आजंती येथील पद्मावती जिनिंगच्या ६ हजार चौ. फुट जागी ठेवण्यात आला  होता. आज एका वाहनातून कापूस खाली केल्या जात असताना अचानक आग लागली़ पाहताच आगीने रौद्र रुप धारण केले.  जोराची हवा सुरू असल्याने सर्वत्र आग परसत गेली.  समयचूकता दाखवत फलाटावर काम करत असलेल्या २० महिला व पुरूष कर्मचाऱ्यांना त्वरीत बाहेर काढण्यात आले. परंतु, आगेत मोठ्या प्रमाणात कापूस राख झाला.
 

 
 
माहिती मिळाल्यानंतर पालिकेचे अग्निशामक दल तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहोचले जिनींगमध्ये आग विझविण्याकरीता नियोजीत यंत्रणा असल्याने साठवलेले पाणी आग विझविण्याकरीता फायदाचे ठरले. दिड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग प्राथमिक स्वरूपात नियंत्रणात आली परंतु, अन्य फलाटांवर ठेवण्यात आलेल्या कापसाला आग लागू नये, याची खबरदारी घेत वर्धा व अन्य स्थानांहून अग्निशामक पथक बोलविण्यात आले़ आगेची माहिती मिळताच बाजार समिती सभापती सुधीर कोठारी व अन्य व्यापारी घटनास्थळी पोहोचले.  
जिनिंगचे संचालक कपुर कोचर व संदीप कोचर यांनी आगेच्या बाजूस असलेल्या कापसाच्या गाठी आगेपासून वाचल्याची माहिती दिली ९ वर्षांपासून सुरू असलेल्या या जिनींगमध्ये पहिल्यांदाच आग लागली आहे़ घटनास्थळी आजंतीच्या सरपंच सीमा देवढे तसेच ग्रामसेवक, पटवारी व पोलिसांनी जाऊन पाहणी केली सायंकाळपर्यंत जिनिंगमध्ये आग विझवण्याचे काम सुरू होते.