घटनेच्या रक्षणासाठी सत्याग्रह सुरूच राहणार; ममता बॅनर्जी यांची भूमिका
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
कोलकाता :
 
देशाच्या लोकशाही आणि राज्यघटनेच्या रक्षणासाठी माझा सत्याग्रह सुरूच राहणार असल्याची भूमिका बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सोमवारी मांडली.
 
रविवारी रात्री कोलकाता पोलिस प्रमुखांच्या चौकशीसाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकार्‍यांना अटक करण्यात आल्यानंतर, ममता बॅनर्जी यांनी, केंद्र सरकार सीबीआयचा गैरवापर करीत असल्याचा आरोप करून धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर आज दोन जिल्ह्यांमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे गाड्या अडविल्या.
 
दरम्यान, रविवारी रात्री ममता यांनी जेवणही केले नाही. मेट्रो चॅनेलच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या मंचावर आपल्या काही मंत्री व पक्ष नेत्यांसह त्या धरणे आंदोलनावर बसल्या आहेत. विशेष म्हणजे, २००६ मध्येही ममतांनी, तत्कालिन डाव्या आघाडी सरकारने, सिंगूर येथील टाटाच्या नॅनो कार प्रकल्पाला मंजुरी दिल्याने, याच जागेवर २५ दिवस उपोषण केले होते.
 
आज देशात अभूतपूर्व स्थिती निर्माण झालेली आहे. आणिबाणीपेक्षाही ही स्थिती भीषण असून, लोकशाही आणि राज्य घटनेचे रक्षण करण्यासाठी माझे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पषृट केले.
 
विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा 
 
ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना फोन करून आपले समर्थन कळवले आहे.