' अटल सेतू ' उद्यापासून वाहतुकीसाठी होणार खुला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :04-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
राष्ट्रीय महामार्ग १७ वरील पुलाला 'अटल सेतू ' असे नाव देण्यात आले असून हे तिसरे मांडवी पूल वाहतुकीसाठी उद्यापासून (5 फेब्रुवारी) खुला होणार आहे. मडगावहून म्हापशाकडे आणि विरुद्ध दिशेने जाणा-या वाहनांना या पुलाचा वापर करता येईल. या पुलामुळे राजधानी पणजी शहरातील वाहतुकीची कोंडी ब-याच अंशी कमी होणार आहे. रविवारी (3 फेब्रुवारी) राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी या पुलास भेट दिली होती. 
 
 
फोंडा रॅम्प अजून तयार झालेला नाही त्यामुळे फोंड्याकडे जाणा-या वाहनांना जुन्याच मार्गाचा अवलंब करावा लागेल. या पुलाचे गेल्या रविवारी २६ जानेवारीला उद्घाटन झाले होते. त्यानंतर गेले आठ दिवस हा पूल लोकांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी खुला ठेवण्यात आला. हजारो लोकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या काळात पुलाला भेट दिली. राष्ट्रीय महामार्ग १७ वर पुंडलिकनगर जंक्शन ते मेरशी जंक्शनपर्यंत या पुलाचे बांधकाम झालेले आहे. या पुलामुळे उत्तरेकडून येणा-या वाहनधारकांना राजधानी शहरात न येता थेट फोंडा, मडगांव, वास्कोला जाता येईल तसेच दक्षिणेकडून येणा-या वाहनांना थेट म्हापशाकडे येता येईल.
 
 
साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार फोंडा रॅम्प वगळता या पुलाचे काम 100 टक्के पूर्ण झालेले आहे. उद्या वाहतुकीसाठी हा पूल खुला केला जाईल.
 
 
 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव या पुलाला देण्यात आले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ जानेवारीला या पुलाचे दिमाखदार सोहळ्यात हजारो लोकांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.