अँजेलो परेराचे एकाच सामन्यात दोन द्विशतक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019

नवी दिल्ली :
एका प्रथम श्रेणी सामन्यात एका फलंदाजांने दोन द्विशतक झळकावण्याचा पराक्रम क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसर्‍यांदाच झाला. हा पराक्रम करणारा आहे श्रीलंकेचा २८ वर्षीय अँजेलो परेरा.
 
प्रथम श्रेणी क्रिकेटच्या सुमारे दोनशे वर्षांच्या इतिहासात सामन्याच्या दोन्ही डावात द्विशतक झळकावण्याची किमया पहिल्यांदा १९३८ साली आर्थर फॅगने केली. कोल्हस्टर येथे इसेक्सविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात केंट संघाकडून आर्थर फॅगने २४४ व नाबाद २०२ धावांची द्विशतकी खेळी केली होती.
 
 
 
आता अनिर्णित राहिलेल्या चारदिवसीय प्रथम श्रेणी सामन्यात सिंहलीज स्पोर्टस्‌ क्लबविरुद्ध नॉनडिस्ट्रिक्ट क्रिकेट क्लबचे नेतृत्व करताना अँजेलो परेराने पहिल्या डावात २०३ चेंडूत २०१ धावा फटकावल्या, तर दुसर्‍या डावात २६८ चेंडूत २३१ धावा काढल्या. सिंहलीज क्लबच्या पाटा खेळपट्टीवर अँजेलोने श्रीलंकेचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू धम्मिका प्रसाद व सचित सेनानायके याच्या प्रभावी मार्‍याचा सामना करत पहिल्या व दुसर्‍या डावात क्रमशः ९९.०१ व ८६.१९ च्या सरासरीने धावा काढल्या. त्याने आपल्या या विक्रमी खेळीत ४० चौकार व ४ षटकार हाणले.