माझ्या जिवाचं पॅरीस!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
पॅरीसला एका कॉन्फरन्ससाठी जाणं झालं. त्या आधी युरोपातील बाकी देश फिरून झाले होते.
दररोज कॉन्फरन्स संपली की भटकायला बाहेर पडायचं... सप्टेंबरचे दिवस असल्याने जवळजवळ रात्री दहा वाजेपर्यंत उजेड होता. त्याहीपेक्षा सुखाची गोष्ट अशी की, विमानतळावर उतरल्यावर तिथेच मी संपूर्ण आठवडाभरासाठीचं (बस, रेल्वे, मेट्रो या सगळ्यांसाठी एकच असं) तिकीट काढलं होतं. फिनलँडची माझी मैत्रीण, मिया कामानिमित्ताने पॅरिसमधेच होती. पहिल्याच दिवशी ती भेटणार होती. मलाकॉफ येथून भटकायचं कसं, हा प्रश्न विमानतळावरच मिळालेल्या मेट्रोच्या विविधरंगी नकाशामुळे सोपं झालं.
 
संध्याकाळी मी मियाला भेटले. ऑपेरा स्टेशनबाहेरच्या ऑपेराच्या इमारतीत भेटलो. ती इमारत इथल्या स्थापत्याचा अप्रतिम नमुना आहे. या इमारतीत संगीतिका (ऑपेराज), बॅले व इतर अनेक संगीताचे वर्षाला 380 कार्यक्रम होतात. सुमारे आठ लाख प्रेक्षक (त्यापैकी 17 टक्के परदेशी) त्याचा आनंद घेतात. या कंपनीचं वर्षाचं बजेट आहे सुमारे 200 मिलियन युरोंचं. त्यातले 100 मिलियन सरकार देतं, तर इतर पैसा बॉक्स ऑफिसमधून जमा होतो.
बरंच फिरून झाल्यावर तिने रस्त्यांच्या एका वळणावर माझा हात धरून मला थांबवलं.
समोर होता आयफेल टॉवर!! आम्ही जरा दूर असल्याने तो पूर्णपणे दिसत होता.
आता ती मला अगदी अखेरच्या दिवशीच भेटू शकणार होती.

 
 
त्यानंतर रोज संध्याकाळी माझी पॅरिस सैर सुरू झाली. द ला कॉन्कॉर्द पाहताना त्याच्या आजूबाजूची विस्तीर्ण जमीन लक्षात आली. सुमारे 20 एकर मोठा हा चौक... शहर विस्तारत असतानाही इमारती बांधण्यासाठी त्यावर कुणीही अतिक्रमण केलं नव्हतं. पंधारावा किंग लुई गंभीर आजारातून बरा झाल्यावर आनंदाप्रीत्यर्थ इथल्या लोकांनी या चौकात 1763 मध्ये त्याचा मोठा पुतळा बांधला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात 1792 मध्ये हा पुतळा पाडून तिथे सध्या दिसतो तो स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा बसवला. ज्या 1119 लोकांचा इथे शिरच्छेद केला गेला त्यात किंग लुईदेखील होता. 1836 मध्ये 230 टनांचा 75 फुटी गुलाबी ग्रॅनाइटचा हा स्तंभ इथे ठेवला गेला, जो इजिप्तच्या व्हॉइसरॉयने फ्रान्सला पाठवला होता. व्हॉइसरॉयने पाठवण्याचं कबूल केलेल्या तीनपैकी फक्त एकच इथे पोहोचवला गेला.
इथे बघण्यासारखी अशी दोन पाण्याची कारंजीही इथे आहेत. हीदेखील एकोणिसाव्या शतकात बांधलेली आहेत. फ्रेंच इतिहास इथे जीवंत आहे. चारही दिशांना खास ऐतिहासिक वास्तू नजरेस पडतात. पूर्वेला तुलेरीस, पश्चिमेला आर्क द ट्रिऑम्फ, दक्षिणेला पलॅस बॉरबॉन(आता नॅशनल असेंब्ली) आणि उत्तरेला मॅडेलिन! सगळं जर नीट पाहायचं तर खूप चालावं लागतं. प्रिन्सेस डायनाला ज्या भुयारी रस्त्यावर (अल्मा टनेल) अपघाती मृत्यू आला तो मार्ग मला पाहायचा होता.
पोटात भूक असताना शाकाहारी खाण्यासाठी शोधत होते. शेजारच्या एका लहान दुकानात एक तरुण फोनवर गुजरातीत बोलत होता. मी त्याच्याकडे एक सँडविच मागितलं. त्याला वेगळ्या भाषेची गरज नव्हती. मग पैसे देताना त्याला गुजरातीत, ‘‘केटला?’’ असा प्रश्न केला. मग आमचं बोलणं झालं. त्याचे आई- वडील पॅरीसलाच असतात. हा भारतात काकांकडे होता. दोन वर्षांपूर्वी पॅरीसला आलेला.
 
मी बाहेर येऊन परत शांझ एलिसे अॅवव्हेन्यूवर पोहोचले. हा पॅरिसमधला सर्वात सुंदर रस्ता. 70 फुट रुंद आणि 1910 फुट लांब सरळ रस्ता! त्याच्या एका टोकाला होती आर्क द ट्रिऑम्फ ही विजयाची कमान व दुसर्‍या टोकाला इजिप्तने फ्रान्सला परत पाठवलेला स्तंभ, द ला कॉन्कॉर्द. त्यातही मला कमान खूप जवळ होती, तर स्तंभ दूर दिसत होता. त्या रस्त्याच्या मधे उभं राहून दोन्ही दृष्टिपथात येत होते. खूप पर्यटक तिथे उभे राहून फोटो काढत होते. मी पण जाऊन मधोमध उभी राहिले. एकदम संपूर्ण पॅरिस माझ्याभोवती शेजारून जार्णाया मोटारींच्या वेगाने फिरत असल्याचं मला जाणवलं. मी क्षणभर डोळे मिटले. तिथे उभं राहून पॅरिसकडे पाहणं हा एक सुखद व अलौकिक सोहळा होता. द ला कॉन्कॉर्दवर संध्याकाळचं सोनेरी ऊन पडलं होतं. तसंच ते आर्क द ट्रिऑम्फवरही पडलं होतं. मधल्या रस्त्यावर मात्र बाजूच्या इमारतींच्या लांब सावल्या होत्या. त्या तिथे उभं राहाणं हा पॅरिस भेटीतला एक खास भाग होता. अनेकविध प्रकारच्या मोटारींतून जाताना बाहेर रस्त्याच्या मध्ये उभ्या राहिलेल्या मंडळींकडे पाहून त्यांना किती वेशांतले व देशांतले लोक पाहायला मिळत असतील! तो रस्ता सुंदरच होता. दोन्ही बाजूंनी झाडं होती. त्यानंतर होती दुकानांची रांग. जगातली सगळी उच्च लेबल्स इथे दुकानं थाटून होती. त्यापैकी कोणत्याही दुकानातून काहीही विकत घेणं मला परवडण्यासारखं नव्हतं. तरीही मी एक-दोन दुकानांत जाऊन काहीतरी विकत घेण्याची इच्छा असल्याचं नाटक केलं. मला सारखी ‘इव्हििंनग इन पॅरिस’ या सिनेमातली दृश्य आठवत होती. फ्रान्समधल्या स्ट्रासबर्ग इथे पाहिली तशी प्रेमीजनांची मस्ती इथेही दिसत होतीच.
 
आर्क द ट्रिऑम्फच्या जवळ जाणं, हे तिथे पोहोचल्यावर आलंच. खूप छान कोरीव काम त्यावर केलेलं होतं. 1936 मध्ये बांधून पूर्ण झालेली ही 164 फुट उंच, 148 फुट लांब व 72 फुट रुंद कमान, लोकांना 12 दिशांनी नेत-आणत होती. मी त्या कमानीखाली उभी राहिले. रस्त्यापलीकडे असलेल्या गवतावर बसून ती कमान जास्तच उंच भासत होती.
मी परत जायला निघाले व पुन्हा एकदा त्या भव्य कमानीकडे पाहण्यासाठी थबकले. तेवढ्यात कुणीतरी बाई पांढरा लांब गाऊन घालून त्या गवतावरून कमानीच्या दिशेने धावताना मला दिसली. तिला थांबवायला हवं. जीव जाईलना तिचा... मला काही लोकांनी ओरडून थांबविलं. मग कळलं चित्रीकरण सुरू होतं. बारीक डोळ्यांचा चीनी- जपानी माझ्यामागे धावत आला व म्हणाला, प्लीज. शूिंटग चायना फिल्म!
 
शांझ एलिसे या रस्त्यावर परत एकदा थोडं चालावं असं मनात आलं. अंधार होऊ लागला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जेवणासाठी टेबलं मांडलेली होती. भूक चाळवणारा अन्नाचा सुवास आमंत्रण देत होता. पण तिथे एकटंच बसून जेवणारा माणूस करंटा असावा. गपचूप मी पुढच्या मेट्रोे स्टेशनच्या दिशेने गेले. डायनाच्या मृत्यूचा सापळा बनलेला भुयारी मार्ग मला दिवसाच्या उजेडात बघायचा होता. अर्थात रात्री साडेदहाच्या सुमारासही रस्त्यावर दिव्यांची रेलचेल होती. उजेड भरपूर होता. पण तरीही परत येण्यासाठी काही तरी आकर्षण शिल्लक असण्याची गरज होती...