केंद्राकडून केरळ सरकारला १०२ कोटींचे बिल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
नवी दिल्ली :
केंद्र सरकारने केरळ सरकारला पूरस्थितीवेळी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जी मदत करण्यात आली होती, त्या हेलिकॉप्टरच्या वापरांचे १०२ कोटी रुपयांचे बिल पाठवले आहे. केरळ सरकारला पाठविण्यात आलेले हे बिल पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
 
 
भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा वापर केरळमधील पूरस्थितीवेळी करण्यात आला होता. नागरिकांना वाचविण्यासाठी, अन्नधान्य पूरविण्यासाठी, केरळच्या मदतीसाठी सैन्याचे जवान केरळवासीयांच्या मदतीला आले होते. त्यावेळी वायू दलानेही मोठी कामगिरी बजावली होती. मात्र, वायूदलाच्या या धाडसी कामगिरीची किंमत केंद्र सरकारने केरळ सरकारला मागितली आहे. केंद्र सरकारने केरळ सरकारला १०२ कोटी रुपयांचे बिल जारी केले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील पूरस्थितीवेळी वापरात आणलेल्या हेलिकॉप्टरचे हे बिल असल्याची माहिती सोमवारी राज्यसभेत देण्यात आली.
केरळमधील पूरस्थितीवेळी भारतीय वायू दलाच्या हेलिकॉप्टरने तब्बल ५१७ फेऱ्या केल्या. त्यामध्ये ३७८७ नागरिकांचा जीव वाचवला असून १३५० टन वजनाच साहित्याची देवाण-घेवाण केली आहे. तर, दुसऱ्या ६३४ फेऱ्यांमध्ये ५८४ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले असून २४७ टन सामानाची वाहतूक केली आहे. त्यामुळेच, १०२.६ कोटी रुपयांचे बिल केरळमधील राज्य सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली. याबाबत वायू दलाकडून संपूर्ण तपशील घेण्यात आल्याचे भामरे यांनी सांगितले. दरम्यान, केरळ सरकारकडून हे बिल केंद्रीय गृह विभागाला पाठविण्यात आले असून या बिलाची तपशीलवार माहिती घेण्याचं सांगितले आहे.