मुख्यमंत्री राळेगणसिद्धीत दाखल; अण्णा हजारे उपोषण सोडणार ?
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
अहमदनगर : लोकपाल, लोकायुक्त आणि अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धीमध्ये गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे अण्णा उपोषण सोडणार का ? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 
 
 
 
जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे हेदेखील राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून आज अण्णा उपोषण सोडणार असल्याचे महाजन यांनी सांगितले. सोमवारीही (4 फेब्रुवारी) महाजन आणि भामरे यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली होती.
 
 
 
आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी लोकपाल कायदा लागू व्हावा अशी मागणी अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच, लोकपाल कायद्याचा जुना मसुदा आणि अण्णा हजारे यांनी सरकारला दिलेला मसुदा या दोन्ही मसुद्यातील काही मुद्दे एकत्र करून नवा मसुदा तयार करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, कृषि मूल्य आयोगाला स्वायत्ता मिळावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशीही  अण्णांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
उपोषणाचा सातवा दिवस असल्याने सरकारच्या निषेधार्थ राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी चूल बंद ठेऊन एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. जनावरेही आंदोलनस्थळी आणून बांधली आहेत.