भारत-न्यूझीलंड पहिला टी-२० सामना उद्या
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
  •  स्थळ : वेस्टपाक स्टेडियम, वेलिंग्टन 
  • वेळ : दुपारी १२.३० वाजतापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस्‌ व डीडी स्पोर्टस्‌वर
वेलिंग्टन : 
न्यूझीलंडविरुद्धची वन-डे मालिका ४-१ ने खिशात घातल्यानंतर आता भारतीय संघ टी-२० मालिकेतही आपल्या विजयाची लय कायम राखू इच्छिणार आहे. बुधवारी वेस्टपाक स्टेडियमवर भारत व न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० सामना खेळला जाणार आहे.
 
कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करीत आहे. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनासोबतच टी-२० संघात कृणाल पांड्यासुद्धा दिसणार आहे. युवा फलंदाज शुभमन गिलशिवाय सिद्धार्थ कौल व खलील अहमदसुद्धा संघाचे सदस्य राहतील.
 
 
 
भारताने २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्ये केवळ दोन टी-२० सामने खेळले व दोन्ही सामने गमावले. आता तब्बल एका दशकानंतर भारताकडे न्यूझीलंडमध्ये त्यांच्याविरुद्ध केवळ टी-२० सामनाच नव्हे तर मालिका जिंकण्याचीसुद्धा संधी आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत भारताविरुद्धच्या आठ सामन्यात सहा सामने जिंकलेले आहेत. भारत व न्यूझीलंड यांच्यात अखेरचा टी-२० सामना २०१७ मध्ये तिरुवनंतपुरम येथे झाला होता व यात न्यूझीलंडने सहा गड्यांनी विजय नोंदविला होता.
 
 
 
 
तीन महिन्यांच्या या दौर्‍याची सांगता १० फेब्रुवारी रोजी तिसरा व अंतिम टी-२० सामन्याने होणार आहे.
आता दौर्‍याच्या अंतिम टप्प्यात आक्रमक भारतीय संघात काही नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे, जेणेकरून नवीन मालिकेची सुरुवात जोरदार ढंगाने करु शकेल.