२०२३ हॉकी विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारत उत्सुक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
लाऊसेन,
२०२३ साली होणार्‍या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने आपली दावेदारी सादर केली आहे. या यजमानपदासाठी सहा देशांनी दावा केला आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) आज दिली.
आपण १३ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान पुरुष किंवा महिलांची हॉकी विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यास उत्सुक असल्याचा प्रस्ताव भारताने सादर केला आहे. याच स्पर्धेच्या यजमानपदासाठी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडसुद्धा उत्सुक आहे.
 
 
 
अलीकडेच गतवर्षी भुवनेश्वरमध्ये झालेल्या हॉकी विश्वचषकासह भारताने पुरुषांच्या तीन विश्व हॉकी स्पर्धेचे यजमानपद भूषविले आहे. स्पेन, मलेशिया व जर्मनीने १ ते १७ जुलै २०२२ मध्ये स्पर्धा आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
 
इच्छुक देशांकडून १ ते १७ जुलै २०२२ किंवा १३ ते २९ जानेवारी २०२३ अशा पसंतीच्या कालावधीत हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठीचे प्रस्ताव ३१ जानेवारीपर्यंत मागविले होते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता एफआयएच या प्रस्तावांची छाननी प्रक्रिया सुरु करणार असून कार्यकारी मंडळ अंतिम निर्णय घेईल, असे एफआयएचचे सीईओ थिएरी वेल यांनी सांगितले.