एकच प्याला... प्रबोधनाचा!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
जात-वंशश्रेष्ठत्व आणि दारू ही भारतीय समुदायाला लागलेली व्यसनं आहेत आणि त्यावर कितीही प्रबोधन झाले आणि त्यामुळे कुटुंबसंस्था आणि समाज कितीही रसातळाला गेल्याची असंख्य उदाहरणे असली, तरीही यापासून सुटका ती नाही. राजकारण, समाजकारण या दोन विकृतींमुळे प्रदूषित झालेली आहेत. राजकारणातून सत्ताकारण आणि मग सत्ता राखण्यासाठी या दोनच अस्तित्वाचा अस्त्र म्हणून वापर होत असतो. दोन्हींमुळे माणसाच्या चेतासंस्था क्षीण होतात आणि मानसिक चिंता, शारीरिक वेदनांपासून काही क्षण मुक्ती मिळत असते. आपण करत असलेल्या प्रमादांचाही आनंद मिळतो, त्याहीपेक्षा असले प्रमाद करण्याचे बळ मिळत असते. तिकडे चंद्रपुरात सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात व्यसनांवर चिंतन सुरू असताना, इकडे राज्याच्या उपराजधानीत आणि प्रबोधनाच्या राजधानीत एका दारुड्या मुलाने, त्याची आई त्याला मद्य घेण्यासाठी पैसा देत नाही म्हणून मारमार मारून तिचा जीव घेतल्याची अत्यंत दारुण अशी घटना घडली. ममता िंहगे ही साठ वर्षांची महिला मोलमजुरी करून, तिचा आणि तिच्या ४५ वर्षांच्या प्रौढ मुलाचा सांभाळ करणारी. हिने काबाडकष्ट करायचे आणि तिच्या मुलाने मात्र त्यातून दारू ढोसायची, हे रोजचेच... मात्र, त्या माउलीला एका क्षणी याचा कंटाळा आला आणि तिने नकाराचा अधिकार वापरला. दारूसाठी बेभान झालेल्या तिच्या मुलाने मात्र तिला त्यासाठी ठारच केले...
 
चंद्रपुरात तेव्हा माध्यमांचे कर्ते व्यसनमुक्ती या विषयावर मंथन करत होते, त्याच वेळी त्यांना ही बातमी प्रसारित करण्याचीही वेळ आली. दारूबंदी नव्हे तर दारूमुक्ती, हाच यावरचा उपाय आहे, हे त्या मंथनातून निष्पन्न काढले जात होते. दारूबंदी ही दारू न पिण्याची सक्ती आहे. सक्ती केली की मग त्या सक्तीतूनच मुक्ती मिळविण्याचे मार्ग शोधले जातात. समाजाला लागलेले हे रोग काही आजचे नाहीत. प्रसिद्ध कथाकार जी. ए. कुळकर्णी त्यांच्या एका कथेची सुरुवात करताना म्हणतात, ‘‘मी आता तुम्हाला इतकी प्राचीन गोष्ट सांगणार आहे, इतकी प्राचीन आहे ही गोष्ट की, त्या काळी दारूचाही शोध लागला नव्हता...’’ माणसाला माणूसपणाची जाणीव झाली तेव्हाच त्याने कदाचित मद्याचाही शोध लावला असेल िंकवा त्याला तो लागला असेल. कुठलीतरी चीज कुजविल्यावरच मद्यनिर्मिती होत असते. त्यामुळे माणुसकी कुजवूनच मद्य जिवंत राहत असावे. दारू पिणार्‍याला मरण आहे, मात्र दारू अमर आहे. अनेक पिढ्या तिने गारद केल्या आहेत.
 
एकच प्याला, हे यावरचे अमर नाट्य लिहिणारे राम गणेश गडकरी यांची विदर्भ ही जन्मभू. भारत हा पाच हजार खेड्यांचा देश आहे. ग्राम संस्कृतीच आमची परंपरा आहे. विदर्भ तर कृषिवलांचाच प्रदेश, मात्र आता शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी ग्रासला आहे. या नैराश्यात दारू त्याला मरणाजवळ नेत असते, हेही वास्तव नाकारून चालणार नाही. गाडगेबाबांनी यासाठी प्रबोधन केले. जिवाचा आटापिटा केला. एकीकडे गाडगेबाबांच्या नावाने ग्राम स्वच्छता मोहीम सुरू करणार्‍या तत्कालीन राज्यकर्त्यांनी दारू गावागावांत पोहोचवली. एकवेळ खेड्यात पाणी नाही मिळत, पण दारू हमखास मिळते. साखर कारखान्यातले उपउत्पादन म्हणून दारूच त्यांना फायद्यात ठेवत राहिली आहे. हे कारखाने फायद्यात राहावे यासाठी तर दारूचे पाटच खेड्यांपयऱ्ंत पोहोचविले गेले. त्या काळात, ‘‘गेलं गेलं गेलं दादा जुनं राज गेलं, नारंगी-मोसंबीनं कंगाल केलं...’’ असं एक तुंबडी गीत प्रसिद्ध झालं होतं. ग्रामस्थांचा विवेक जीर्ण व्हावा आणि विचारशक्ती क्षीण व्हावी, यासाठी दारू हे अस्त्र करण्यात आलं. आणिबाणीनंतर तर या प्रक्रियेला वेगच आला. ग्रामव्यवस्था त्यामुळे मोडकळीस आली आणि परावलंबी झाली. ‘‘वारे इंदिरा तेरा खेल, सस्ती दारू, महंगा तेल...’’ हा नाराही त्याच काळातला. दारूने ग्रामव्यवस्था कंगाल केली अन्‌ मग, ‘‘तुम्ही केवळ आम्हाला मतदान करा, बाकी आम्ही पाहून घेतो.’’ असा संदेश देत स्वयंपूर्ण खेडी दुबळी, परावलंबी करण्यात आली. कल्याणकारी राज्याच्या नावाखाली नाकर्तेपण, परावलंबित्व पेरण्यात आले. दारू हे त्या सार्‍याचं मुख्य अस्त्र होतं. महात्मा गांधींच्या नावाने राजकारण करत सत्ता उपभोगणार्‍यांनी गांधींचा हा देश दारूत बुडविला आणि त्याला महसुलाचा सोनेरी वर्ख दिला. त्यामुळे नागरी विवेक महसुलाच्या अर्थकारणाच्या चमचमाटात हरवून गेला.
 

 
 
महाराष्ट्रात दारूबंदी करणे अशक्य असल्याचे सरकारचे मत आहे. राज्याला दारूवरील उत्पादनशुल्क आणि त्यावरील विक्रीकरातून सुमारे २१ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न दरवर्षी मिळते. राज्याच्या आर्थिक उत्पन्नातील उत्पादन शुल्काचा सिंहाचा वाटा आहे. राज्य सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतला, तर दरवर्षी २१ हजार कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागेल... असे हीच मंडळी आता सांगत असतात. शेतकर्‍यांचे कैवारी म्हणवून घेणार्‍या शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाचे राज्यात सरकार असताना आणि केंद्रात ते कृषिमंत्री असताना ज्वारी, बाजरी, गहू यांसारख्या धान्यापासूनही दारू बनविण्याची शक्कल काढली. त्यामुळे हे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना म्हणे फायदा होणार होता. सडणारे धान्य ‘कामी’ येणार होते. धान्यापासून दारू आणि फळांपासून वाईन करण्याचेच विचार यांच्या डोक्यात येत राहिले. त्याला विरोध करणारे डॉ. अभय बंग यांच्यावर टीका करण्यात आली आणि नंतर पवारांच्याच सरकारने त्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ दिला... परवाच्या व्यसनमुक्ती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अभय बंगच होते आणि त्यांनी, दारूच्या महसुलावर राज्य चालत नाही, असे आकडेवारीने सिद्ध करत सांगून टाकले.
 
एक मात्र नक्की की, दारूबंदीने फारसे काही साध्य होत नाही. वर्धा जिल्हा गांधींचा म्हणून कधीचा दारूबंदी असलेला आहे आणि आता त्या दारूबंदीचे व्यंग्य झालेले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतही दारूबंदीचे केवळ समाधानच आहे. दारूबंदी असलेल्या राज्यांतही तीच स्थिती आहे. बिहारात निवडणुकीच्या प्रचारात दारूबंदीचे आश्वासन नितीशकुमारांनी पाळले, चार हजार कोटींचा वार्षिक महसूल त्यामुळे बुडणार आहे. आता बिहारात काय स्थिती आहे, हे तपासून यावे. बिहारच्या आधी गुजरात, मणिपूर, मिझोरम, आंध्रप्रदेश आणि केरळ या राज्यांनीही त्या राज्यात दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. मणिपूर आणि मिझोरम या राज्यांतील दारूबंदी वर्षभरातच उठवावी लागली. हरयाणात बन्सीलाल मुख्यमंत्री असताना त्यांनीदेखील तेथे दारूबंदी केली होती. परंतु, तेथेही दारूबंदीच्या कालखंडात अवैध दारूचा महापूर आला. शेवटी हरयाणातीलही दारूबंदी उठविण्यात आली. आंध्रप्रदेशात चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात दारूबंदीची घोषणा केली. तेव्हा मराठवाड्यातील आंध्रप्रदेशलगतच्या जिल्ह्याच्या सीमेवर दारूच्या दुकानांची रांगच्या रांग लागली.
 
ज्या राज्यांनी दारूबंदी केली त्यांची ही स्थिती आहे. दारूमुळे गरीब जनतेचे संसार उद्ध्वस्त होतात. त्यामुळे दारूबंदी झाली पाहिजे, ही मागणी सामाजिक दृष्टिकोनातून योग्य आहे. दारूच्या शारीरिक दुष्परिणामांइतकेच आर्थिक दुष्परिणाम गरिबांच्या वाट्याला अधिक येतात. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतात. मजूर, कष्टकरी वर्ग जी दारू पितात, त्यातले अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. तसेच अनेक विषारी द्रव्ये त्यात मिसळली जातात. त्यामुळे हजारो लोकांचे अशा दारूने नाहक बळी जातात. यातून मार्ग काढायचा असल्यास प्रबोधनाशिवाय मार्ग नाही...