स्मृती मंधाना फोर्ब्सच्या यादीत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
नवी दिल्ली :
आयसीसीच्या महिला फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान पटकावणार्‍या भारताच्या स्मृती मंधानाला मानाच्या फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळाले आहे. फोर्ब्सकडून भारतातील अंडर ३० अशी एक यादी तयार करण्यात आली आहे.
या यादीत स्मृतीला स्थान देण्यात आले आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कमावणारी हिमा दास, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
 
 
 
फोर्ब्स इंडियाच्या ३० अंडर ३०चे हे सहावे वर्ष आहे. या यादीमध्ये खेळाडूबरोबर मनोरंजन क्षेत्र, मार्केटिंग अशा एकूण क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळविला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. स्मृतीने २०१८ वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १५ वन-डे सामन्यात दोन शतके व ८ अर्धशतके झळकावली आहेत. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने (७५१) ७० गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग ७६ गुणांच्या पिछाडीसह तिसर्‍या स्थानावर आहे.