शासनाच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकर्‍यांचा : सुधीर मुनगंटीवार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :05-Feb-2019
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत समारंभ

- सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य विद्यापीठाला १५१ कोटी रूपयाचा निधी

अकोला :
कृषी विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी शेती उत्पादन वाढीसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची गरज आहे. शासनाच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकर्‍यांचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले.येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३३ व्या दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
 

 
 
यावेळी राज्याचे कृषीमंत्री तथा प्रतिकुलपती चंद्रकांतदादा पाटील ,राणी लक्ष्मीबाई केद्रींय कृषी विश्व विद्यालय झाशीचे कुलगुरू प्रा. अरविंद कुमार , महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे तसेच डॉ.पं.दे.कृ.वी.अकोलाचे कुलगुरु डॉ.विलास भाले व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
मुनगंटीवार पुढे म्हणाले की, पाच पिढयांपासून शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलांनी आधुनिक शिक्षण घेवून शेतात काम करणे आवश्यक आहे. तसेच विद्यापीठाने आपले तंत्रज्ञान चार भिंतीतून शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला १५१ कोटी रूपयाचा निधी देण्यात येईल. यापैकी ५० टक्के निधी विद्यापीठाने संशोधनावर खर्च करावा असे त्यांनी सांगितले.
 
विद्यार्थ्यांनी लालबहाद्दूर शास्त्री यांनी देशाला दिलेला जय जवान, जय किसान या मूलमत्रांचा अवलंब करून शेतकर्‍यांची सेवा करावी. शासन त्यांना सर्वोपरी मदत करण्यास तयार असून पिकांच्या उत्पादन वाढीसाठी शासन कटिबध्द आहे कारण राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकर्‍यांचा असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 
 
 
 
भविष्यातील गरज पाहता पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना शेतीची सेवा करावी लागणार आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे संशोधन, तंत्रज्ञान विकसीत करावे लागणार आहे, त्यासाठी कृषी पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांनी शेतात जावे असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले. शेतीची निगा राखण्यात आणि तिची सेवा करण्यात आपण कमी पडलो असेही ते म्हणाले.
 
तुम्ही आज जी पदवी प्राप्त केली तो कागद नव्हे तर भारतमाता, शेती विकासाचा मंत्र आहे. " विद्यार्थी तुम आगे बढो, शासन तुम्हारे साथ है," असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना देत त्यादृष्टिने विद्यार्थ्यांनी चालावे असे आवाहन मुनगंटीवर यांनी केले.
 
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी प्रास्ताविक केले. या समारंभात २०६८ पदवीधरांना पदवी प्रदान करण्यात आली. यात बी.एस.सी. कृषीचे १४६४, बी.एस.सी. उद्यानविद्या १०४, बी.एस.सी.कृषी जैवतंत्रज्ञान ४६, बी.टेक कृषी अभियांत्रिकी ७९, बी.एस.सी. वन विद्या २५, बी.एस.सी. कृषी व्यवसाय व्यवस्थापन २५, बी.एस.सी. अन्न शास्त्र १५, एम.एस.सी.कृषी २०५, आणि पी.एच.डी.च्या २४ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
एम.एस.सी.कृषी पदवी परीक्षेत सर्वाधिक मूल्यांक प्राप्त करून लालसिंग राठोड या विद्यार्थ्याने पाच सुवर्णपदके व एक रौप्य पदक मिळविले. बी.एस.सी. कृषी पदवी परीक्षेत सर्वाधिक मूल्यांकन प्राप्त करून स्नेहल विनय चव्हाण या विद्यार्थिनीने तीन सुवर्ण , तीन रौप्य , व तीन रोख पारितोषिक प्राप्त केलेत. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ठ संशोधन केल्याबद्दल डॉ. शमसूल हयात यांना सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले.
 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तथा कृषी विद्यापीठाचे प्रतिकुलपती चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते २,९०२ पदवी, पदव्युत्तर तसेच पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावर्षी मुलींनी बाजी मारली असून, २५ मुलींनी सुवर्ण व रौप्य पदके प्राप्त केली.